मनपात खासगी सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती होणार

0

मुंबई । मुंबई महापालिकेच्या सुरक्षा खात्यात सध्या तब्बल 1015 रक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे खाजगी सुरक्षा रक्षक मंडळासोबत रक्षक नेमण्याचा करार करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. मात्र, खासगी सुरक्षा रक्षकांची भरती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पालिकेच्या अटी व शर्तीनुसार मुंबई आणि ठाणे जिल्हा यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेण्याची कार्यवाही पालिकेने सुरू केली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने नगरसेवकांना दिली आहे. खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंबंधी मुख्य मालकाशी कोणत्याही प्रकारचा करारनामा करण्याची तरतूद कायदा आणि योजनेत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेत सुरक्षा रक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. आणखी किती वर्षे कंत्राटाच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार अशी विचारणा शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला केली आहे तर रक्षकांच्या 968 जागा रिक्त असताना सुरक्षा रक्षक पालिकेबरोबर लेखी करार करणार नाही. करार न करण्यामागची नेमकी कोणती कारणे आहेत,याविषयी साागृह नेते यशवंत जाधव यांनी प्रशासनाकडे खुलासा मागितला आहे.

सायन तलावासाठी खासगी सुरक्षाची नियुक्ती
सुरक्षा रक्षक कामगार संघ व सुरक्षा रक्षक मंडळ (मुंबई आणि ठाणे जिल्हा) यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षक घेण्याची कार्यवाही सुरू आहे आणि सायन तलाव हा मोठा असून त्या ठिकाणाचा आढावा घेऊन खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी द. ह. पाटील यांनी सातमकर यांना दिली.

सुरक्षा रक्षक मंडळासोबत करार करण्याची मागणी
सुरक्षा रक्षक मंडळ ही कल्याणकारी संस्था असून शासनाने निर्माण केलेले स्वायत्त मंडळ आहे. ‘मंडळ’ हे ठेकेदार नसल्यामुळे कंत्राटी कामगार कायदा 1970 मधील तरतुदी मंडळाला लागू होत नाहीत. खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजनेतील तरतुदीनुसार मुख्य मालकाने मंडळात नोंदीत (रजिस्टर) होणे व मंडळामार्फत नोंदीत (रजिस्टर्ड) सुरक्षा रक्षक नियुक्त करणे व कायदा आणि योजनेतील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक असल्यामुळे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंबंधी मुख्य मालकाशी (महापालिकेशी) कोणत्याही प्रकारचा करारनामा करण्याची तरतूद कायदा आणि योजनेत नाही. यामुळे सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई महापालिका आणि ठाणे मनपाबरोबर करार करत नाही, असे द. ह. पाटील यांनी सभागृह नेत्यांना सांगितले. मुंबई पालिकेतील सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, असा दावा प्रमुख सुरक्षा अधिकारी यांनी केला.