जळगाव। महानगर पालिका पाणी देत नसेल तर स्वखर्चाने परिसरातील नागरिक पाईप लाईन टाकत असल्याने त्यास तरी परवानगी द्यावी यासाठी मोहीडी रोडवरील खुबचंद साहीत्या टावरमधील महिलांनी बुधवारी महापालिकेवर मोर्चा आणला होता. त्वरीत पाईप लाईन टाकण्याची परवानगी देण्यात यावी अशा मागणी पाणीपुरवठा विभागात निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील मोहाडी रस्त्यावर खुबचंद साहीत्या टावर या भागात सुमारे दोनशे कुटुंब राहत आहेत. या भागात महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नाही. यासाठी अनेकवेळा परिसरातील नागरिकांनी आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन दिली आहेत.
वारंवार मागणी करुनही प्रशासन दखल घेत नाही
वेळोवेळी दिलेल्या निवेदनांची दखल घेण्यात आलेली नाही. या भागातील नागरिक सामुहीक वर्गणी गोळा करुन पाण्याचे टँकर मागवत आहेत. गेल्या 3 वर्षापासून नागरिक हा त्रास सहन करीत आहेत. याला कंटाळून प्रकाश साहीत्या यांच्यासह नागरिकांनी महानगर पालिकेच्या रायसोनी नगरजवळील दौलत नगर टाकीपर्यंत स्वखर्चाने पाईप लाईन टाकण्याची तयारी दर्शविली त्यानुसार त्यांना महापालिकेने मंजूरी दिली आहे. पाईपलाईन टाकण्याच्या कामास अद्याप परवानगी दिलेली नाही. ही परवानगी मागण्यासाठी या परिसरातील महिलांनी महापालिकेवर धडक दिली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांना याबाबत निवेदन दिले असून तात्काळ परवानगी देण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रकाश साहित्या, अनिता पवारल मीना घोडेस्वार, प्रतिभा पाटील, दिपाली बडगुजर, लताबाई ओतारी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी समाजाप्रती जबाबदारी जाणून घ्यावी
जळगाव। विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून समाजाप्रती आपली असलेली जबाबदारी जाणून घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने अंतर्गत सुरक्षा आणि पोलिसांची भूमिका या विषयावर डॉ.सुपेकर यांचे बुधवार 29 मार्च रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ.शांताराम बडगुजर, डॉ.अर्चना देगावकर, डॉ.तुकाराम दौड, प्रा.तुषार रायसिंग उपस्थित होते.यावेळी प्रा.शांताराम बडगुजर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.तुषार रायसिंग यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.संदीप केदार यांनी केले.