मनपा अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे 15 कोटींची विकासकामे रखडली

0

स्थायी समिती सभेत सत्ताधाऱ्यांसह विरोधक आक्रमक

जळगाव– तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विकासकामांकरीता 25 कोटींचा निधी दिला होता.त्यानुसार निविदा काढून मक्तेदारांना कार्यादेश देखील देण्यात आले आहेत.मात्र अडीच ते तीन वर्षानंतरही तब्बल 15 कोटींची विकासकामे अद्यापही सुरु केले गेले नाहीत. तरी देखील अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही.केवळ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे कामे रखडली असल्याची नाराजी व्यक्त करत संबंधित मक्तेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी सत्ताधारीसह विरोधकांनी केली. मनपा स्थायी समितीची सभा सभापती अ‍ॅॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर आयुक्त उदय टेकाळे, उपायुक्त अजित मुठे, उत्कर्ष गुटे, मुख्य लेखापरिक्षक संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते.

आयुक्त बंगल्यात एलईडीसाठी चक्क साडेचार लाख खर्च

शिवाजीनगरातील आयुक्तांच्या बंगल्यातील बागेत एलईडीसाठी साडेचार लाख रुपये खर्चाची गरज आहे का असा सवाल नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. आवश्यक कामांना प्राधान्य न देता अनावश्यक कामांना प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. नागरिक कर भरतात मात्र सविधा दिल्या जात नाही.शहराती विस्तारीत भागांमध्ये सर्वत्र अंधार असतांना आयुक्तांच्या बंगल्यातील बगीच्यात एलईडी लावण्यासाठी का खर्च केला जातो असे म्हणातच आयुक्त टेकाळे यांनी
यापुढे एकही रुपया खर्च करायचा नाही अशी सूचना देवून ते मुख्यमंत्र्यांच्या व्हिसीला निघून गेले.

शहरातील शिवाजीनगरातील नागरिकांना येण्या -जाण्यासाठी 1992 च्या विकास आराखड्यात शनिपेठ रस्त्यावर पुल मंजूर आहे. परंतू याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नविन पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे नवनाथ दारकुंडे यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. यावर सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी याबाबत माहिती घेण्याची नगरचना विभागाच्या अभियंत्यांना सूचना दिल्या.

गणेश कॉलनी येथील ख्वॉजामीया दर्गालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मागे हॉटेल चालविण्याची परवनागी दिली होती. परंतू तेथे गैरकारभार चालत असल्याने मंजूरी रद्द करून हॉटेल काढली होती. परंतू आता तेथे पून्हा अनधिकृतपणे हॉटेल सुरु करण्यात आले असतानाही मनपा अधिकार्‍यांना माहिती नाही.दरम्यान,अतिक्रमण तत्काळ काढावे अशी मागणी नितीन बरडे यांनी केली.