डॉ.माधवी खोडे-चवरे अद्यापही रुजू झाल्या नाहीत
जळगाव: मनपा आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी डॉ.माधवी खोडे- चवरे यांच्या बदलीचे आदेश 12 फेब्रुवारीला जारी झाले आहेत.मात्र त्या अद्यापही रुजू झालेल्या नाहीत. आयएएस अधिकारी असल्यामुळे त्यांची बदली रद्द करुन त्यांच्याऐवजी मर्जीतील अधिकार्यांची नियुक्ती करावी यासाठी काही राजकीय नेत्यांकडून वरिष्ठ स्तरावर लॉबिंग केली जात असल्याच्या हालचाली सुरु आहे. मात्र डॉ.खोडे- चवरे यांच्या जागी वस्त्रोद्योग मंडळावर संचालक म्हणून बदली झालेले अधिकारी अभिजीत बांगर हे नागपूरात रुजू झाल्यानंतर त्या जळगावला रुजू होणार असल्याचे बोलले जात आहे.
मनपा आयुक्त डॉॅ.उदय टेकाळे सेवानिवृत्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मात्र रिक्त जागेवर नागपूर येथील वस्त्रोद्योग मंडळाच्या संचालक डॉ.माधवी खोडे-चवरे यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. बदलीचे आदेश दि.12 फेब्रुवारीला जारी झाले आहेत. त्यामुळे त्या दि. 17 फेबु्रवारीला रुजू होणार होत्या. मात्र अद्याप पर्यंत रुजू झालेल्या नाहीत. डॉ.खोडे-चवरे या आयएएस अधिकारी असल्यामुळे अडचणीच्या ठरतील का? असा प्रश्न मनपाच्या राजकीय वर्तृळात उपस्थित होत आहे. तसेच मनपा आयुक्त म्हणून मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी काही राजकीय नेत्यांकडून वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ अधिकार्यांकडे लॉबिंग सुरु आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह काही अधिकारी उत्सूक नसल्यामुळे मंत्रालयातील एका अधिकार्याची शिफारस करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे डॉ.माधवी खोडे-चवरे यांची बदली रद्द करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. एकीकडे डॉ.खोडे-चवरे यांना जळगावला रुजू होण्यास विलंब होत असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे वस्त्रोद्योग मंडळावर संचालक म्हणून बदली झालेले अधिकारी अभिजीत बांगर रुजू झाल्यानंतर डॉ.माधवी खोडे-चवरे या रुजू होणार असल्याची चर्चा आहे.