जळगाव। प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी शहरात अचानक स्वच्छतेच्या कामांची पहाणी केली. या भेटी दरम्यान त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून स्वच्छतेच्या कामांची माहिती करून घेतली. यावेळी श्री. निंबाळकर यांनी एकूण 7 प्रभागांची पहाणी केली. या पहाणीत त्यांना 7 प्रभागांत सफाईचे असमाधानकारक चित्र दिसल्याने या प्रभागतील 8 सफाई ठेकेदारांना अंतीम नोटीसा बजावल्या. प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी प्रभाग 29 मध्ये गणपती नगर,आदर्श नगर, प्रभाग 17 मध्ये रामानंद नगर गिरणा टाकी, प्रभाग 16 मध्ये हरिविठ्ठल नगर, प्रभाग 12 मध्ये जीवन नगर शंकरअप्पा नगर, प्रभाग 5 मध्ये जुने जळगाव व कंचन नगर, प्रभाग 22 मध्ये आंबेडकर नगर, जुने जळगाव, प्रभाग 27 मध्ये भास्कर मार्केट, गिरणा कॉलनी आदी भागात फिरुन क चरा कुंड्या, रस्ते स्वच्छता व गटारींची पाहणी केली.
नागरिकांशी साधला संवाद
प्रभाग क्रमांक 36 महाबळमध्ये ठेकेदाराकडून स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी थांबविण्यासाठी नगरसेविका उपायुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून पैशांच्या ऑफर देत तडजोडीचा प्रयत्न केल्याचा आरोप नगरसेविका अश्विनी देशमूख व त्यांचे पती विनोद देशमुख यांनी केला. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी सकाळी 6 वाजेपासून शहरातील विविध प्रभागांमध्ये जावून स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील उपस्थित होते. प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी पाहणी दरम्यान नागरिकांना दैंनदिन सफाईच्या कामाबद्दल विचारणा केली असता बहुतांश भागात असमाधानकारक सफाईची कामे असल्याचे नागरिकांनी सांगीतले. या पाहणीदरम्यान अनेक भागात साचलेला कचरा, भरलेल्या कचरा कुंड्या प्रभारीआयुक्तांना दिसल्यात. अनेक दिवसांपासून सफाई कामगार व घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत होते. दरम्यान, असमाधानकारक काम असलेल्या सात ठेकेदारांना प्रभारी आयुक्त निंबाळकर यांच्या सूचनेनुसार उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी अंतिम नोटीसा काढल्यात. तीन दिवसात या ठेकेदारांनी समाधानकारक खुलासा सादर न केल्यास त्यांचे मक्ते रद्द करण्याचा इशारा देखील आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिला आहे.