धुळे । धुळे मनपाच्या आयुक्त संगीता धायगुडे यांनी पदभार घेवून अवघा 1 वर्षांचा कालावधीच लोटलेला असतांनाच अचानक त्यांची बदली मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. दारम्यान त्यांच्या बदलीचे वृत्त कळताच धुळे मनपा आवारात काही राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतीषबाजी करुन जल्लोष साजरा केला. तर ज्या कर्मचार्यांना आणि अधिकार्यांना आयुक्तांच्या जवळचे समजले जात होते. त्यांनी मात्र कुठलेही भाष्य न करता या बदलीच्या वृत्तावर आपणास काही माहित नाही, असे दाखवून तुम्ही सांगता म्हणून कळत आहे, असे प्रत्येकालाच भासविण्याचा प्रयत्न केला.
नवे आयुक्त सुधाकर देशमुख!
धुळ्यातून बदली झालेल्या आयुक्त धायगुडेंच्या जागेवर सुधाकर देशमुख हे नवे आयुक्त म्हणून धुळ्यात येणार आहेत. गट अ (निवड श्रेणी) सहव्यवस्थापकीय संचालक तथा सचिव, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे येथे देशमुख कार्यरत होते. तर कांबळेंच्या जागेवर नंदुरबार येथील जिल्हा प्रशासनाधिकारी शांताराम गोसावी यांना धुळ्याचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मनपा आयुक्त धायगुडे यांनी कर्मचार्यांसह अधिकार्यांना शिस्त लावली होती. तर मनपाचा राज्यस्तरावर गौरव त्यांच्या कारकिर्दीत झाला. परंतु, अलिकडेच त्यांनी 4 नगरसेवकांना भोगवटा प्रमाणपत्रावरुन नोटीसा बजावल्याने धुळ्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांकडेच त्यांची तक्रार करण्यात आली होती. भाजपाच्या प्रतिभा चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांसह थेट मंत्रालयस्तरावर त्यांची तक्रार केली होती. आयुक्तांच्या बदलीचे वृत्त कळताच समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमिन पटेल, साबीर मोतेबर यांच्यासह समर्थकांनी मनपा आवारातच फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.
नोकरीप्रती प्रामाणिकता
आयुक्त कार्यालयातील स्वीय सहाय्यकाने मध्यरात्री 12 वाजून 2 मिनिटांनी मेलवर पडलेला बदलीचा आदेश सकाळी 10 वाजताच पाहून त्याच्या प्रतीही काढून ठेवल्या. मात्र, आधी त्या आयुक्तांना दाखवू मगच इतरांना देवू ही त्यांची नोकरीप्रतीची प्रामाणिकता त्यांनी दाखविली. आयुक्तांच्या सोबतच सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना त्याच पदावर लातूर महानगरपालिकेत हलविण्यात आले आहे. त्यांनी उद्याच त्या ठिकाणी हजर होवून शासनाला तसा मेलद्वारे अहवाल पाठविण्यास आदेशित केले आहे.