जळगाव। मेहरूण परिसरात उघड्यावर मांस विक्रीविषयी नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी दुपारी 12 वाजता अक्सानगरात मनपाच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचार्यांनी कारवाई केली. त्यावेळी विक्रेत्यांनी कर्मचार्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण करून दगडफेक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांना शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एच. हक यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला.
शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
मेहरूण परिसरातील नगरसेविका सुभद्रा नाईक, इकबाल पिरजादे यांनी त्याच्या प्रभागात अतिक्रमण करून उघड्यावर मांस विक्री करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासंदर्भात पालिकेत तक्रार दिली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी 12 वाजता अक्सानगर येथे कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी साजीद अली आबिद अली, अरुण मोरे, अर्जुन सोनवणे, हिरामण बाविस्कर, रेहानाबी शेख, सलमान भिस्ती अकिल बागवान यांचे पथक गेले होते. त्यावेळी विक्रेते शेख मुख्तार शेख गफुर (वय 40), शेख अबरार शेख मुख्तार (वय 22) यांनी वाद घालून हुज्जत घातली होती.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणून कर्मचार्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात मुख्तार शेख आणि अबरार शेख यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायाधीश हक यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी तर संशयितातर्फे अॅड. एस. सी. पावसे यांनी कामकाज पाहिले.