मनपा कर्मचार्‍यांशी हॉकर्सची हुज्जत

0

जळगाव । शहरातील शिवाजी रोड, सुभाष चौक व बळीरामपेठेतील भाजीपाला विक्रेते व हॉकर्सला स्थालांतरीत करण्याचा निर्णय महासभेत मंजूर झाला आहे. नो हॉकर्सझोन असलेल्या सुभाष चौकात दुकाने थाटलेल्या विक्रेत्यांवर बुधवारी कारवाई करीत असतांना काही विक्रेत्यांनी पोलिसांसमोरच अतिक्रमाण विभागाच्या कर्मचार्‍यांसोबत अरेरावी करण्याचा प्रकार घडला. हॉकर्स व कर्मचार्‍यांमधील वादामुळे काही वेळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बळीराम पेठ, शिवाजी चौक व सुभाष चौकात भाजीपाला विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करीत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणाच्या हॉकर्सला तात्पुरत्या स्वरुपात ख्वॉजामियाच्या झोपडपट्टीच्या जागेवर स्थालांतरीत करण्याच्या ठराव महासभेत मंजूर झाला आहे. अनेक वेळा स्थालांतरणाची कारवाई अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आली. मात्र मनपा प्रशासनाला स्थालांतरण करण्यासाठी अपयश आले आहे. परंतू मनपाकडून स्थालांतरणाची कारवाई ही गेल्या दोन दिवसांपासून पोलिस बंदोबस्तामध्ये सुरु आहे.

पोलिसांची बघ्याची भूमिका
अतिक्रमण काढत असतांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवून नये म्हणून मनपा प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त मागण्यात आला होता. बंदोबस्त मिळाल्यानंतर अतिक्रमण विभागातील कर्मचारी हॉकर्सवर कारवाई करीत असतांना हॉकर्स व कर्मचार्यांमध्ये अरेरावी होत असतांना पोलिसांनी बघ्याची भूमीका घेतली होती. बंदोबस्त नसला तरी अतिक्रमाणाची कारवाई सुरुच राहणार शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ व शिवाजी रोड वरील हॉकर्सला स्थालांतरीत करण्यासाठी कारवाई सुरु असून ही कारवाई पोलिस बंदोबस्त नसला तरी सुरु राहणार असल्याचे अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांनी सांगीतले.

10-15 जणांनी घातला गोंधळ
आज दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास सुभाष चौकात काही हॉकर्सं यांनी नो हॉकर्सझोन मध्ये हातगाड्यांवर दुकाने लावली होती. या विक्रेत्यांच्या 5 हातगाड्या जप्त केल्यानंतर 10-15 जणांनी हातगाड्या परत करण्याची मागणी केली. परंतू मनपाच्या कर्मचार्‍यांनी गाडी देण्यास नकार दिल्याने विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांशी अरेरावी करीत हुज्जत घातली. दरम्यान याप्रकारानंतर अतिक्रमण पथाकातील कर्मचार्‍यांनी झालेल्या गोंधळाचे चित्रीकरण केले आहे. तसेच हॉकर्स व मनपाचे कर्मचारी शनिपेठ पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. परंतू सायंकाळी उशीरापर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

गोंधळाचे व्हिडीओ चित्रीकरण
सुभाष चौक परिसराला नो हॉकर्स झोन म्हणून जाहिर केला आहे. परंतू याठिकाणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. या विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त केल्याने 10-15 जणांनी अरेरावी करीत गोंधळ घातला. घडलेल्या या सर्व प्रकारचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून ते पोलिसांना देण्यात येणार आहे.