जळगाव- शहरातील कांचननगर परिसरात राहणारे मनपा अग्निशमन विभागाचे बडतर्फ कर्मचारी वाल्मिक सुपडू सपकाळे यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्त्या केली होती. दरम्यान, रविवारी सपकाळे यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मनपातून बडतर्फ कर्मचार्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे तसेच मयत कर्मचार्याच्या कुटूंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
कांचननगर परिसरात राहणारे मनपा अग्निशमन विभागाचे कर्मचारी वाल्मिक सुपडू सपकाळे वय-45 यांना काही महिन्यांपूर्वी कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. सपकाळे यांनी शनिवारी रात्री राहत्या घरात 10.30 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्त्या केली.
रविवारी सकाळी वाल्मिक सपकाळे यांचे कुटूंबीय व नातेवाईक जिल्हा रूग्णालय जमलेले होते. यावेळी सपकाळे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
मनपातून आजपर्यंत बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचार्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, मयत वाल्मिक सपकाळे यांच्या कुटूंबातील एका सदस्याला त्यांच्या जागी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. मनपा आयुक्त जिल्हा रूग्णालयात आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अन्यथा मृतदेह मनपासमोर ठेवण्यात येईल, अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली होती. मनपाचे अधिकारी श्री.भोळे यांनी मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी मनपा अधिकार्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले.