मीरा भाईंदर : सध्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबईलगतचे शहर म्हणून मीरा-भाईंदर शहराची विशेष ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे या शहरातील मुंबईप्रमाणे मराठी टक्का तसा घसरत चालला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अमराठी मते निर्णायक ठरतील, अशी शक्यता आहे. म्हणून सर्वच राजकीय पक्ष आता अमराठी समाज घटकांना योग्य ते प्रतिनिधीत्व देण्याच्या प्रयत्नात आहेत.
भाजपच्या यादीत अमराठी उमेदवारांचा भरणा
भाजपनेही त्यादृष्टीने उमेदवारी देण्याचा विचार केला आहे. मीरा भाईंदरचे बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक स्वरुप पाहता स्थानिकांसोबतच अमराठी समाज घटकालाही या महापालिकेतील भाजपचे प्रतिनिधित्व देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी घोषणा मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केली. तसेच स्मार्ट सिटीसह केंद्र आणि राज्याच्या विविध विकास योजना मीरा भाईंदरमध्ये आणण्यासाठी आपणकायमच प्रयत्नशील राहू अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.
महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेला अमराठी मतदार लक्षात घेता, लोकसंख्येच्या प्रमाणात अमराठी उमेदवारांना पक्षाची उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. विशेष म्हणजे डॉक्टर्स, वकील अशा उच्चशिक्षितांसोबतच उद्योजक आणि युवकांचाही समावेश सर्व राजकीय पक्ष करत आहेत, त्यामुळे समाजातील सर्व घटकांची मते मिळावीत, याकरता राजकीय पक्षांनी ही रणनीती स्वीकारली आहे.