प्रभाग क्रमांक 19 (अ) साठी शिवसेनेतर्फे निता सोनवणे यांचा अर्ज
जळगाव: मनपाच्या प्रभाग क्रमांक 19 अ च्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे निता मंगलसिंग सोनवणे आणि अपक्ष उमेदवार म्हणून आशा कोळी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उद्या दि. 22 रोजी अर्जाची छाननी होणार असून माघारीची मुदत 24 पर्यंत आहे. पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेनेतर्फे प्रयत्न सुरु आहे.
प्रभाग क्रमांक 19 अ मधील नगरसेविका लता सोनवणे यांनी चोपडा विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवून विजयी झाल्यानंतर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेनेतर्फे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या भगिनी निता मंगलसिंग सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतांना आमदार लता सोनवणे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते बंटी जोशी, अण्णा भापसे, नगरसेवक गणेश सोनवणे, साजीद खाटीक, माजी महापौर राखीताई सोनवणे, भाजपातर्फे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, गटनेेते भगत बालाणी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, कॉग्रेसचे देवेंद्र पाटील, श्याम तायडे, जाकीर बागवान, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, रोहन सोनणे, मंगलसिंग सोनवणे आदी उपस्थित होते. शिवसेना आणि भाजप विरोधक असले तरी अर्ज दाखल करतांना मात्र सोबत असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान,अपक्ष उमेदवार म्हणून आशा कोळी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.