जळगाव। शहरातील सफाईच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशारे राजे निंबाळकर यांनी शुक्रवार पासून महानगर पालिकेचे कर्मचारी साफसफाई करीत असलेल्या वार्डांमध्ये पहाणी सुरू केलेली आहे. यानुसार शनिवार 15 जुलै रोजी प्रभार आयुक्त श्री. निंबाळकर यांनी महापौर नितीन लढ्ढा यांच्या वार्डांत पहाणी केली. प्रारंभी मनपा प्रशासन इमारतीपासून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीशेजारील गोलाणी मार्केटमध्ये अस्वच्छता दिसून आल्याने प्रशासनाचा स्वच्छतेचा दावा फोल ठरला आहे.
नागरिकांनी केली तक्रार
नेहरूचौकांत पाहणी करीत असतांना परिसारातील नागरिकांनी त्यांच्या भागात नेहमीच गटारी तुंबत असल्याची तक्रार केली. या तक्रारीनुसार गटारींची तपासणी करतांना आयुक्तांना स्टुरीस्ट कॉम्प्लक्स येथील गटारीवर स्लॅब टाकल्याने कर्मचार्यांना गटर काढता येत नसल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांना गटारी तोडण्याचे नोटीस दुकानदारांना देवून गटारीवरील संध्याकाळपर्यंत स्लॅब काढण्याचे आदेश दिलेत. तसेच जर दुकानदारांनी स्वतःहून स्लॅब काढले नाहीत तर खान यांना स्लॅब काढून त्याचा खर्च दुकानंदारांकडून घेण्याचे आदेश दिलेत. मेट्रो जवळील गटारीत मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने श्री. निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ही गटार साफच करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करत गटर साफकरण्याचे आदेश दिलेत. पद्मालय विश्रामगृहा समोरील चाह विक्रेत्याचे अतिक्रमण काढण्याचे सांगितले. तसेच विश्रामगृहा समोरील इमारतीचा कचरा बोळीत अस्ताव्यस्त पडलेला आढळल्याने इमारतींच्या रहीवाशांना नोटीस बजाविण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, विश्रामगृहासमोरील चहा टपरी शेजारील टपर्या उचलण्याचा आदेशही आयुक्तांनी दिलेत. टेरेसवर बांधकामानंतर उर्वरीत मटेरीअल पडलेले आढळले.
कचरा पेटीतील कचरा बाहेर
ग्राऊंडफ्लोअरवरून पहिल्या मजल्यावर जातांना जिन्यावर कचरा आढळून आला. तर गोलाणी मार्केट मधील रहिवासी असलेले भागातून जातांना पाईप लाईन फुटून पाणी पडत होते. गोलाणी मार्केटमध्ये महानगर पालिकेतर्फे ठेवण्यात आलेले कचरा पेटींत कचरा टाकलेला नव्हता. कचरापेटींचे झाकण उघडेच होते. तर काहींचे झाकणच तुटलेले होते.
इतर प्रभागांना धावती भेट
शिवाजी नगर येथून आयुक्तांनी बळीराम पेठ, सराफबाजार, नवी पेठ, इस्लामपुरा, रथ चौक जोशी पेठ मार्गांने जात पहाणी केली. टूरीस्ट कॉम्प्लेक्स येथील गटारीवर टाकण्यात आले स्लॅब अतिक्रमण विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने दुपारी काढण्यात आले. याचा खर्च संबंधीत दुकानदारांकडून वसूल करणार असल्याचे एच. एम. खान यांनी सांगितले.
पद्मालय विश्रामगृहात कचर्याचा ढिग
आयुक्तांनी पद्मालय विश्रामगृहाच्या परिसराची पहाणी करतांना त्यांना विश्रामगृहात कचरा साचलेला दिसून आला. यावेळी तेथील कर्मचार्यांस त्यांनी कचरा बाहेर फेकण्याचे आदेश देवून साफसफाई न ठेवल्यास घरी पाठवून देईल अशी तंबी दिली. विश्रामगृहातून बाहेर पडल्यावर त्यांना रस्त्यातच बांधकाम मटेरीअल अस्ताव्यस्त पडलेले आढळून आल्याने बांधकाम करणार्यास नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत. गोलाणी मार्कटमधून श्री. निंबाळकर यांनी शिवाजीनगरकडे मोर्चा वळविला. त्यांनी वार्ड क्र. 3 मध्ये शिवाजीनगरला पहाणी केली. यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी झोपडपट्टीधारकांचे पाणी गटारीतून ओपन प्लेसमध्ये येत असल्याची तक्रार आयुक्त श्री. निंबाळकर याच्याकडे केली. नागरिकांनी दुषीत पाणी येत असल्याची तक्रार केली.
बारींनी मांडल्या समस्या: गोलाणी मार्केटच्या टेरेसवर पाहणी करतांना श्री. निंबाळकर यांना पाणी साचलेले दिसले. तसेच या कचर्यात फुटलेल्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याची तपासणी केली असता टेरेसवरील पाण्याच्या टाकीचा पाईप लिकेज झाल्याचे आढळून आल्याने पाणी पुरवठा अधिक्षक डी. एस. खडके यांना तात्काळ लिकेज दुरूस्त करण्याचे आदेश दिलेत. यावेळी शिवसेना महानगर महिला अध्यक्षा मंगला बारी यांनी आयुक्त श्री. निंबाळकर यांना मार्केटमधील समस्यांबाबत अवगत केले. मंगला बारी यांनी मार्केटच्या सुरक्षेतच्या दृष्टींना लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. मार्केटमध्ये कोणी रिनीव्हल केले आहे व त्याची परवानगी घेण्यात आली आहे का याची विचारणा करत अहवाल देण्याची सूचना केली.
अग्निशमन कचर्याच्या गरड्यात
गोलाणी मार्केटकडे जात असतांना त्यांना अग्निशमन दलाचे कार्यालय नजरेस पडले. या कार्यालयात जाऊन आयुक्त निंबाळकर यांना कार्यालयत स्वच्छता दिसून आली. मात्र, कार्यालयाच्या बाजूला कचरा पडलेला होता. याची विचारणा कर्मचार्यांना केली असता गोलाणी संकुलातील व्यापारी कचरा नेहमी फेकत असल्याचे सांगितले. अग्निशमन कार्यालयच्या बाजुला असलेल्या गोलाणीच्या प्रवेशद्वारातून त्यांनी गोलाणीत प्रवेश केला. रस्त्यातच हातगाड्या लावण्यात आल्याचे आढळून आले. मार्केटमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास हातगाड्यांमुळे अडकाठी येण्याची शक्यता असल्याने या हातगाडीधारकांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण अधिक्षकांना दिलेत. यानंतर ते सरळी फुले लिलाव ठिकाणी गेल्यावर त्यांना तेथे अस्वच्छता आढळली.