पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीच्या आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीतील सत्ताधारी भाजपच्या प्रत्येकी एक सदस्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी शुक्रवारी झालेल्या महासभेत नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये विधी समिती सदस्यपदी सागर गवळी तर क्रीडा समिती सदस्यपदी कुंदन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीमध्ये एप्रिल महिन्याच्या सभेत नवीन नगरसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्यांची प्रत्येक समितीत निवड केली आहे.
भाजपच्या नगरसेविका अश्विनी बोबडे यांची क्रीडा समितीत नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, नावडत्या क्रीडा समिती नियुक्ती होताच बोबडे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. मी विधी समिती मागितली असताना मला क्रीडा समिती दिली आहे. मी पात्र असुनही मला डावलले जात आहे. पक्ष सोडून आलेल्या आयारामांना महत्त्वाची पदे दिली जातात. निष्ठावान नगरसेवकाना डावलले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे क्रीडा समितीतील एक जागा रिक्त झाली होती. भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी नऊ मे रोजी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या जागेमुळे एक जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही समितीतील रिक्त झालेल्या जागेवर विधी समिती सदस्यपदी सागर गवळी तर क्रीडा समिती सदस्यपदी कुंदन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.