मनपा शहरातील धोकादायक वृक्षांची तात्काळ घेणार दखल

0

जळगाव : शहरातील सुकलेले धोकादायक वृक्ष तात्काळ काढण्यात यावा असा ठराव महाननगर पालिका वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत गुरूवार 29 डिसेंबर रोजी संमत करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयाजवळ सुकलेल्या वृक्षाची फांदी पडून निष्पाप महिलेचा बळी गेल्यानंतर महापालिकेला ही जाग आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, उदय पाटील, ए.ओ. सोनवणी, प्रभागसमिती पदाधिकारी संदेश भोईटे, पृथ्वीराज सोनवणे, नितीन नन्नवरे, अजय पाटील आदी उपस्थित होते.

शहरातील सुकलेल्या वृक्षांची मनपाचे अभियंते पाहणी करतील. पाहणी अहवाल उपायुक्तांकडे येईल जे वृक्ष फारच धोकादायक वाटत असतील त्यांना 4 दिवसाच्या आत काढून टाकण्याचे आदेश देण्याचे अधिकार उपायुक्तांना देण्यात आले आहे.

बेकायदा वृक्षतोड केल्यास गुन्हा दाखल करणार
बैठकीत महापौर नितीन लढ्ढा यांनी बेकायदा वृक्ष तोड करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा 10 हजार रुपये तसेच विनापरवानगी झाडाच्या फांद्या तोडल्यास 5 हजार रुपये दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली. दंड भरल्यास मनपा गुन्हा दाखल करणार नाही असा ठराव करण्यात आला. धोकादायक पद्धतीने वाढलेले झाड तोडण्यासाठी शहर अभियंत्यांनी परवानगी दिल्यानंतर 4 दिवसात योग्य ती कारवाई करून कार्यत्तोर मंजूरी घेण्यास मान्यता बैठकीत देण्यात आली.

तरणतलाव बीओटी तत्वावर देणार
मनपाच्या मालकीचा तरणतलावाची सध्या वाईट अवस्था झाली आहे. मनपाच्या उत्पन्नाअभावी तरणतलावचा दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च निघत नाही. यामुळे आता तरणतलाव ज्या परिस्थितीत आहे. तसाच बीओटी तत्वावर देण्याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील गोल्ड जीमचे संचालक चंपालाल सोनी यांनी तरणतलाव सुरु करण्यासंदर्भात प्राथमिक बोलणी केली आहे.

नागरिकांना आवाहन
राष्ट्रीय महामार्गावरील समांतर रस्त्यांवरील कचरा उचलून त्यांचे सपाटीकरण करण्याची काम सध्या सुरु आहे. यापुढे नागरिकांनी समांतर रस्त्यांवर कचरा टावूै नये. असे आवाहन करण्यात आले आहे. कचरा टाकतांना आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असा प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ मनपाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.