मुंबई । आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व चेंबूरनाका महानगरपालिका शाळा संकुलतर्फे शालेय मनपा मुलांमुलींसाठी मोफत कॅरम सराव वर्ग व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन 16 ते 19 एप्रिलदरम्यान सकाळच्या सत्रात चेंबूरनाका मनपा शाळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कॅरममधील तज्ञांचे मार्गदर्शन खेळाडूना लाभणार आहे. स्पर्धात्मक निवड चाचणीमधील विजेत्या-उपविजेत्यांना 20 एप्रिल रोजी होणार्या शालेय मुंबई सुपर लीग कॅरम स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. आयडियल कॅरम उपक्रम मुंबई महानगरपालिकाच्या शाळेतील इयत्ता दहावीपर्यंतच्या मुलामुलींना मोफत खुला आहे.
खेळाडूंना कॅरम खेळाच्या नियमांची देखील माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे शालेय खेळाडूंना चँम्पियन कॅरम बोर्डावर सराव मार्गदर्शन दिले जाणार आहे. गत वर्षापासून आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे काही ठरावीक मनपा तसेच खासगी शाळांना आयडियल विनाशुल्क कॅरम उपक्रम सुरु करून जेष्ठकॅरमपटू सुहास कांबळी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू महेंद्र तांबे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच जे.व्ही. संगम, राष्ट्रीय कीर्तीचे कॅरमपटू शशिकांत कोन्डकर, प्रणेश पवार, चंदू करंगुटकर, शेखर चव्हाण, डॉ. जितेंद्र लिंबकर आदी मंडळींचे मार्गदर्शन उपलब्ध करण्यात आले होते. आयडियल मोफत कॅरम उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्या बृहन्मुंबईमधील शालेय मनपा मुलांमुलींनी अधिक माहितीसाठी डॉ. जितेंद्र लिंबकर (9967834508), चेंबूरनाका महानगरपालिका शाळा संकुल येथे शालेय वेळेत 14 एप्रिलपर्यंत दुपारी 1.00 वाजेपर्यंत संपर्क साधावा.