मनपा शाळांच्या बकाल मैदानांचा विकास करणार

0

मुंबई । मुंबई महापालिकेतील अनेक शाळांमधील मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नाहीत. काहींना बकाल स्वरूप आले आहे, अशा मैदानांचा विकास करण्याचा धोरणात्मक निर्णय पालिकेने घेतला आहे. हा निर्णय सर्वच शाळा व खासगी संस्थांना बंधनकारक राहील, असे स्पष्टीकरण प्रशासनाने स्थायी समितीत दिले. मुंबई खेळाच्या मैदानांची वानवा आहे. शालेय मुलांना मैदाने उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने मैदानांचा विकास करण्याचे निश्‍चित केले आहे. आर दक्षिण, पी उत्तर, एच पूर्व विभागातील 7 शाळांतील मैदानांचा विकास केला जाणार आहे. प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आणला होता. खोखो, कबड्डी, हॅडबॉल, बास्केट बॉल आदी क्रीडा प्रकारचा यात समावेश आहे. या खेळांबरोबरच मुलांना क्रिकेट खेळता येईल, अशा स्वरूपाचे मैदान पालिकेने तयार करावे.

शालेय मैदानांचा विकास होणार
तसेच ज्या संस्थांकडे खेळाची मैदाने आहेत, त्यांनाच पालिकेच्या शाळा देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली, तर काही मैदानांत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा नसतो. अनेक मैदाने बकाल झाली आहेत. काहीं खासगी शालेय संस्थांच्या ताब्यात ठेवली आहेत. यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळता येत नाहीत. त्यामुळे पालिकेने अशी मैदाने सर्वप्रथम हस्तांतरित करुन त्यांचा विकास करावा आणि मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत, यासाठी प्रशासनाने नवे धोरण तयार करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. दरम्यान, मुलांना खेळाचे गणवेश दिले जात आहेत. सध्या 7 शालेय मैदानांचा विकास होत आहे. मुंबईतील प्रत्येक शाळांनी मैदानांचा विकास करणे बंधनकारक आहे, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिले.