मनपा शिक्षकांचे 18 महिन्यांपासून पगार थकले

0

जळगाव– मनपा शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचे गेल्या 18 महिन्यांपासून पगार थकले आहे.थकीत पगार द्यावा या मागणीसाठी शिक्षकांसह सेवानिवृत्त शिक्षकांनी आयुक्तांची भेट घेवून निवेदन दिले.
मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे जो पर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत मनपा शिक्षकांचे 50 टक्के पगार करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला होता.त्यानंतर मनपा शिक्षक संघटनेने मुबंई उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने थकीत पगार देण्याचे आदेश दिले होते.मात्र थकीत रक्कम न दिल्याने शिक्षक संघटनेने आयुक्तांविरुध्द अवमान याचिका देखील दाखल केली होती.त्यावेळी न्यायालयाने मनपाला चांगलेच फटकारले होते. त्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांची थकीत काही रक्कम अदा केली होती.परंतु आता 18 महिन्यापासून 160 शिक्षकांचे आणि 11 महिन्यापासून सेवानिवृत्त शिक्षकांचे पगार थकले आहेत.त्यामुळे शिक्षकांनी आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांची भेट घेवून थकीत पगार मिळावा अशी मागणी केली.

आर्थिक अडचणींना सामना
गेल्या 18 महिन्यापासून 50 टक्के पगार थकले असल्यामुळे शिक्षकांसह सेवानिवृत्तांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.परिणामी गृह कर्ज,ग.स.सोसायटीचे हप्ते देखील थकले आहेत.तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी अडचण येत असल्याने हवालदिल झाले आहेत.दरम्यान,थकीत रक्कम मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.