जळगाव । महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक मंगळवार 2 मे रोजी प्रशासकीय इमारतीच्या दुसर्या मजल्यावर सभापती कांचन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजन सैंदाणे, महिला व बालकल्याण विभाग अधिक्षक जगन्नाथ सोनवणे उपस्थित होते. या बैठकीत महापालिका संचलित बालवाडीतील विद्यार्थ्यांना पुरक पोषण आहार पुरविण्यासाठी अंदाजित रक्कम 19 लाख 58 हजार 775 रूपयांच्या खर्चास मान्यतेचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. हा ठराव मंजूर करण्यात
आला.
1625 बालकांना होणार लाभ
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने शासकीय पोषण आहार योजने अंतर्गत 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना 500 व 12 ते 14 ग्रॅम प्रथिने युक्त आहारासाठी प्रती दिन 4.92 रू हा दर विहीत करण्यात आलेला आहे. महापालिकेतर्फे मराठी माध्यमाच्या 13 व सेमी इंग्रजीच्या 19 अशा एकूण 32 बालवाड्या चालविल्या जात आहे. ह्या बालवाड्या सूटी वगळता 245 दिवस चालविले जातात यात शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी अंदाजे 1625 बालकांना पोषण आहार देण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालकल्याण विभागाकरिता 2017-18 वर्षांकरीता अर्थ संकल्पात 2 कोटींची तरतूद करण्यात आलेली असून यातून 19 लाख 58 हजार 775 रूपये एवढा खर्च अपेक्षित असल्याने यास मंजूरी देण्यात आली. बैठकीस महिला व बालकल्याण समितीचे सदस्य सायराबी सपकाळे, उज्वला बाविस्कर, ज्योती चव्हाण, पार्वताबाई भिल, कांचन सनकत उपस्थित होते. तर सुभद्राबाई नाईक, जिजाबाई भापसे, संगिता दांडेकर या सदस्या अनुपस्थित होते.