जिन्हुआ । आशियाई ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेत भारताच्या मनप्रीत कौरने गोळाफेकीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने या सुवर्णपदकाबरोबरच चार रौप्य व दोन कांस्यपदकांचीही कमाई केली. मनप्रीतने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करताना 18.86 मीटपर्यंत गोळा फेकला आणि 2015 मध्ये तिनेच नोंदविलेला 17.96 मीटर हा राष्ट्रीय विक्रम मोडला. पंजाबच्या 26 वर्षीय मनप्रीतने चौथ्या प्रयत्नात हे यश मिळविले. तिने येथील सुवर्णपदकाबरोबरच आगामी जागतिक स्पर्धेचेही तिकीट निश्चित केले. ही स्पर्धा लंडन येथे ऑगस्ट महिन्यात होणार आहे. जागतिक स्पर्धेसाठी 17.75 मीटर हा पात्रता निकष होता.
टिंकू लूला, निनाला रौप्य
चीनच्या बियान साँग हिने 17.96 मीटपर्यंत गोळाफेक करीत रौप्यपदक पटकाविले. लांब उडीत नीना वाराकिलने रौप्यपदकाची कमाई करताना 6.46 मीटपर्यंत उडी मारली. टिंटू लुकाने 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिला हे अंतर पार करयला दोन मिनिटे 3.50 सेकंद वेळ लागला. द्युती चंदने महिलांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळविले. तिला हे अंतर पार करयला 11.59 सेकंद वेळ लागला. पुरुषांच्या विभागात नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक पटकाविले. त्याने 82.11 मीटपर्यंत भाला फेकला. त्याने कुमारांच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना 86.48 मीटर असा विक्रम नोंदवत सुवर्णपदक मिळविले होते. गोळाफेकीत ओमप्रकाश कर्हाना (18.41 मीटर) याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.