आमदार संजय सावकारेंची मागणीची सरव्यवस्थापकांकडून दखल ; तर मराठवाड्यात जाण्याची होणार सोय
भुसावळ- भुसावळ दौर्यावर आलेल्या रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांची भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भेट घेवून प्रवासी हिताच्या विविध विषयांवर चर्चा केली होती. त्यात मनमाड येथून सुटणारी सिकंदराबाद एक्स्प्रेस मनमाड ऐवजी भुसावळ रेल्वे स्थानकावरून सोडण्याची मागणी करण्यात आली होती. मुळात औरंगाबादसह मराठवाड्यात जाण्यासाठी एकही रेल्वे नसल्याने प्रवाशांना रस्ते वाहतुकीने प्रवास करावा लागतो त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर पैसा व वेळ खर्ची पडतो शिवाय ही गाडी स्थानकावर बराच वेळ थांबून असल्याने ती भुसावळातून सोडल्यास भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा त्यामुळे मिळेल, अशी मागणी आमदार सावकारे यांनी केली होती. या मागणीची दखल सरव्यवस्थापक शर्मा यांनी घेतली असून भुसावळ रेल्वे विभागातील त्याबाबत सर्वेचे आदेश दिले आहेत. रेल्वे प्रशासन आता त्याबाबत सर्वे करून अहवाल शर्मा यांना पाठवणार आहे. भुसावळात लवकरच दोन प्लॅटफार्म उभारले जाणार असून त्यामुळे ट्रॅफिकची समस्याही निकाली निघणार आहे.