मुक्ताईनगर । तालुक्यातील सातोड येथील ग्रामसेवक व उपसरपंच यांचा मनमानी कारभार सुरु असून दलित वस्तीचे कामे मंजूर ठिकाणी न करण्याचे व पंतप्रधान योजनेंतर्गत घरकुल बांधकामाचे पैसे काढण्यास शिफारस न दिल्याने तहसील कार्यालय आवारात त्यांच्याविरुद्ध एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
वारंवार तक्रार करुनही कारवाईकडे केले जातेय दुर्लक्ष
सातोड येथील रहिवाशांचे पंतप्रधान योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले असून लाभार्थी म्हणून त्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत. परंतु ते काढण्याकरिता ग्रामसेवकांची शिफारस लागते तसेच सातोड येथील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत शौचालय मंजूर झालेले आहेत. परंतु मंजूर झाले काम हे दलित वस्तीत न करता दुस़र्या ठिकाणी हेतु पुरस्कर ग्रामसेवक व उपसरपंच करत असल्याची तक्रार संदीप भीमराव मोरे व साहेबराव इंगळे यांसह अन्य ग्रामस्थांनी वारंवार गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दिली तरी देखील त्याच्यावर काही एक प्रकारची कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आहेत मागण्या
या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, दलित वस्तीचे काम वस्तीतच करण्यात यावे व शौचालय बांधकामासाठी मंजूर झालेला निधी परत जाऊ नये व पंतप्रधान योजनेंतर्गत घरकूल बांधकामाचे पैसे काढण्याकरता शिफारस देण्यात यावी. तसेच वैयक्तिक स्वच्छ शौचालय बांधकाम व 14वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.