सानपाड्यातील रायन इंटरनॅशनल स्कूलला पालकांचा घेराव, आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने मागितली दोन दिवसांची वेळ
नेरुळ । सानपाड्यातील रायन इंटरनॅशनल स्कुल विरोधात मंगळवारी पालकांनी आंदोलन पुकारून शाळा प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवला. या शाळेच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रशासनाविरोधात आज पालक रस्त्यावर उतरले होते. नाव मोठे व लक्षण खोटे असा काहीसा प्रकार या शाळेबाबत पाहायला मिळत आहे अशी टीका पालक करत होते. पालकांचा हा रुद्रावतार पाहून शाळाप्रशासनाने कोणासही भेटण्यास अनुमती दिली नाही. प्रसिद्धी माध्यमांना देखील आतमध्ये सोडण्यास नकार देण्यात आला. तर शाळेतील प्रशासनाने मात्र उलट आरोप करत हे आंदोलनासाठी आलेले हे पालक भाड्याने आले आहेत त्यामुळे आम्ही कोणाशीही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. मात्र सानपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडवी यांनी शाळेत प्रवेश करून दोन दिवसांत पालकांच्या मागण्या मान्य होतील अशी ग्वाही शाळा प्रशासनाने ए. पी आय पडवी यांना दिली. मात्र, तोपर्यंत पालकांनी शाळा प्रशासन हाय हाय, अशा घोषणा देत आपला कडवा विरोध सुरूच ठेवला होता. पालकांनी शाळेच्या मनमानी कारभारविरोधात पत्रकारांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला.
कोणतीही नोटीस न देता फी वाढवल्याने पालकांमध्ये नाराजी
मुलांना टॉयलेट नसणे, मुलांच्या सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना नसणे, दर्जाहीन शैक्षणिक गुणवत्ता, एकाच वर्गातल्या शिक्षिका सतत बदलत असल्याने मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला आहे. त्यातच रायन इंटरनॅशनल स्कुलच्या या मनमानी कारभारावर कोणत्याही पालकाने सल्ला दिला किंवा तक्रार केली, तर त्या पालकांच्या पाल्यावर राग काढला जात आहे. शाळा प्रशासनाने कोणतीही नोटीस न देता ११ हजरांवरून १३ हजार फी वाढवली आहे. त्या विरोधात देखील पालक नाराजी व्यक्त करत आहेत. शाळा ५ मजल्यांची असताना पहिली ते चौथीच्या मुलांना ४ थ्या व ५ व्या मजल्यावर दप्तराचे ओझे घेऊन चढुन जावे लागत आहे. तर शिक्षक मात्र हातात एक पुस्तक घेऊन खुशाल लिफ्टचा वापर करत आहेत. तर ९ वी व १० वितील मुले लिफ्टने जात आहेत मात्र लिफ्टमध्ये कोणीही सुरक्षा रक्षक नसल्याने किंवा सी सी टीव्ही कॅमेरा नसल्याने एखाद्या मुलाला अपघात झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न पालक विचारत आहेत.
चांगले कौशल्य असलेले खेळाडू शाळेच्या कारभारामुळे दुर्लक्षित
मुलांना अतिरिक्त ऍक्टिव्हिटीसाठी किंवा खेळासाठी निवडले जाते. त्याच्यासाठी भरघोस पैसे घेतले जातात. मात्र कुठे घेऊन जात असताना किंवा खेळ शिकवताना मुलांच्या कॅलेंडरवर पालकांकडून जर मुलाला बरे वाईट झाले तर याला शाळा प्रशासन जबाबदार नसून याची जबाबदारी पालकांची असेल असे लिहून सही घेतली जाते. त्यामुळे पैसे ही भर आणि खात्री ही द्या अशी अवस्था असताना पालक आपल्या पाल्याना कोणत्याही खेळात सहभागी होऊ देत नाहीत त्यामुळे चांगले कौशल्य असलेले खेळाडू शाळा प्रशासनाच्या या कारभारामुळे दुर्लक्षित राहू लागले आहेत. तर पालक भर उन्हात किंवा पावसात उभे राहायला कोणतीही शेड उभारलेली नसल्याने मुलांचे देखील शाळेत जाताना येताना हाल होत आहेत.
आमच्या मुलांना आम्ही या शाळेत का घातले असा पश्चाताप होत आहे. नाव मोठे अन लक्षण खोटे अशी अवस्था या शाळेची आहे. आज आमची मुले भीतीदायक वातावरणात शिकत आहेत. – कृष्णा जाधव, पालक सानपाडा रायन इंटर नॅशनल स्कुुुल
या शाळेत नववी व दहावीच्या मुलांना जबरदस्तीने कॅम्पसाठी दमण येथे नेण्यात येते. यासाठी १७ हजार ५०० रुपये भरावे लागतात. या कॅम्पला फक्त खेळ आणि इतर विषय सांगितले जातात. या कॅम्पला येण्याची जबरदस्ती केली जाते. अन्यथा त्या विद्यार्थ्यांवर राग काढला जातो.
– पालक; रायन स्कुल
मला शाळेत वंदे मातरम म्हणायला बंदी घातली. या गोष्टीचा राग म्हणून मला सतत झाडांना पाणी घाला आंगण झाडून काढा अशी कामे सांगतात – अनंता बनसोड