मोखाडा । मोखाडा तालुक्यात मनरेगाची कामे अत्त्यंत संथ गतीने सुरू करण्यात आलेली आहेत. शासकीय अहवालानुसार तालुक्यात फक्त 111 कामे सुरू असून केवळ 1608 मजुरांच्या हाताला काम देण्यात आलेले आहे. संक्रांती पूर्वी एकाही हजेरी पत्रकाचा पगार होण्याची शाश्वती नसल्याने मजुरांची संक्रांत हलाखीची आणि कडवट होणार आहे. मोखाडा तालुक्यात रोहयो अंतर्गत 16502 जॉबकार्डांची नोंदणी झालेली असून 1445 कामे हातावर शिल्लक असून 810144 मनूष्यदिन निर्मीती होईल असे महसुल विभागाकडील रोहयो यंत्रणेकडून स्पष्ट करण्यांत आलेले आहे.
परंतु मनरेगातील 50% कामे ही ग्रामपंचायतींनी काढायची आहेत. तथापि आज तारखे अखेर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींकडून केवळ 84 कामे काढण्यात आलेली असून, फक्त 1098 मजूरांना काम देण्यात आलेले आहे. कामांचा अनुशेष भरून काढण्याची मुख्य जबाबदारी ही ग्रामपंचायतींची असतांनाही ग्रामपातळीवर त्याबाबत कमालीची चालढकल केली जात आहे, तर यंत्रणांचीही तशीच परिस्थिती असून कृषी, वनविभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम या चार रोहयो यंत्रणांकडून फक्त 27 कामे काढण्यात आलेली असून केवळ 510 इतक्या अत्त्यल्प मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
रोहयो यंत्रणांकडून हेळसांड
एकीकडे शासन कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्याची गळचेपी खुद्द तालुक्यातील रोहयो व्यवस्थेच्या अनास्थेपोटी होत आहे.
कुपोषण निर्मूलनातील दुवा म्हणजे भूक आहे.
त्यादृष्टीने मातांना घरीच रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यांत येणार असल्याचे सूतोवाच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नरनावरे यांनी केलेले आहे.
365 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासणाचे धोरण आहे.
असे असतानाही रोजगारनिर्मिती बाबत एकूणच रोहयो यंत्रणांकडून कमालीची हेळसांड होत आहे.
मात्र, याबाबत नक्की कोणाला जाब विचारायचा या संभ्रमात मोखाड्यातील मजूरवर्ग दिसत आहे.