मनवेलच्या पोलिस पाटलांचे प्रांतांनी केले निलंबन

0

सभेची माहिती पोलिसांना न दिल्याचा ठपका : कारवाईने तालुक्यात उडाली खळबळ

यावल : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना विना परवानगी कुठल्याही नियमांचे पालन न घेता सभा घेण्यात आल्यानंतर त्याबाबतची माहिती पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक असतानाही नियमांचे पालन न केल्याने तालुक्यातील मनवेल येथील पोलिस पाटील सुरेश राजधर भालेराव यांना निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी बुधवारी काढल्याने यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कर्तव्यात कसूर भोवल्याने कारवाई
जळगाव जिल्हा अनुसूचित जाती जमाती महिला अध्यक्ष प्रतिभा मोरे (फैजपूर) यांनी कोरोनाच्या काळात तोंडाला मास्क न लावता 60 ते 70 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा घेतली होती व याबाबत यावल पोलिसात उभयतांच्या विरूद्ध 14 जून रोजी गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता मात्र सभेसंदर्भात पोलिस पाटील या नात्याने सुरेश भालेराव यांनी पोलिस ठाण्याला माहिती देणे अपेक्षित असताना त्यांनी कर्तव्याचे पालन केले नाही शिवाय 29 जून रोजी यावल तहसीलदारांनी त्यांनी नोटीस बजावूनही त्यांनी नोटीसीला उत्तर न दिल्याने बुधवार, 15 जुलै रोजी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी भालेराव यांचे निलंबन केले आहे.

दुसर्‍यांदा पोलिस पाटलाचे निलबंन
गावातील विवाह समारंभातील गर्दीची माहिती लपविल्याच्या कारणावरून म्हैसवाडी, ता.यावल येथील महिला पोलीस पाटील प्रफुल्ला गोटुलाल चौधरी यांना यापूर्वी प्रांताधिकार्‍यांनी निलंबित केले होते तर आता पुन्हा मनवेल पोलिस पाटील निलंबीत झाल्याने पोलिस पाटलांच्या गोटात खळबळ उडाली आहे.