मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह 21 राजकीय पक्षांनी आज भारत बंद पुकारला आहे. या आंदोलनाला मुंबई शहरासह अनेक ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळत आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दादरमध्ये शिवसेना भवन परिसरात ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी जवळपास 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काही कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान बेस्टच्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. तसेच, प्रतिक्षानगर बस डेपोमध्ये सुद्धा काही बसची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या घटनेत बसच्या काचा फुटल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. याशिवाय, चेंबूरमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेने पेट्रोलपंपावर गाढव आणले आणि आंदोलन केले.
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. अशोक चव्हाणयांच्यासहीत सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्त रेल्वे रुळावर उतरले आणि यावेळी त्यांनी लोकल अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अशोक चव्हाणांसोबत माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अन्य नेतेमंडळीही उपस्थित होते.