मनसेकडून आळेफाटा बंदची हाक

0

पुणे । कर्तव्यावरील महिला पोलीस अधिकार्‍याला शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत मनसे आमदार शरद सोनावणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या गोष्टिचा निषेध म्हणून रविवारी आळेफाटा गाव बंद ठेवले आहे.संबधित महिला पोलीस अधिकारी आणि त्यांच्या सहकर्‍यांनी जप्त केलेल्या भोंडवे यांच्या गाडितील गहु हा चोरीचा नाही. तो त्यांनी विकत घेतलेला असून व्यापर करण्यासाठी तो त्यांनी गाडीत साठवून ठेवला होता. मात्र पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन गाडीसह गहू ताब्यात घेतला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 25 हजारांची मागणी केल्याचा आरोप आमदार सोनवणे यांनी केला आहे. याचाच राग मनात धरून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट सांगितले. याच घटनेचा निषेध म्हणून गाव बंद ठेवण्यात आले आहे.

मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डमाळे या शुक्रवारी कर्तव्य बजावत होत्या. यावेळी त्यांनी योगेश भोंडवे याची रेशनिंगच्या गव्हाची बेकायदेशीर वाहतूक करणारी पिकअप गाडी पकडून त्यावर कारवाई केली होती. याचाच राग मनात धरुन आमदार शरद सोनावणे आळेफाटा पोलीस ठाण्याला गेले आणि मी तुला माझ्या ऑफिसला बोलावूनही तू का आली नाही? अशी विचारणा करीत डमाळेंच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्या ठिकाणी जमलेल्या लोकांसमोर त्यांच्या अंगावर धावून गेले आणि रेशनिंगच्या गव्हाची बेकायदेशीर वाहतूक करणारी गाडी सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे शासकीय कार्यात अडथळा आणल्याप्रकरणी आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या मनास लज्जा होईल असे वर्तन केल्याची तक्रार डमाळे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आमदार शरद सोनावणे यांच्यावर गु.रजि 156/18 भादंविक. 353, 509, 186, 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गावडे करीत आहेत.