मनसेकडून मुख्यमंत्र्यांना पारदर्शक गाजरांची भेट

0

नवी मुंबई। राज्य सरकारने नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच, तडका फडकी बदली केली. याचा मनसेने तीव्र निषेध केला असून, मुख्यमंत्र्यांना 3 किलोची गाजरे बरणीत टाकून पाठवली आहेत. तशी माहिती नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी फक्त राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांपुरता पारदर्शकतेचा फार्स केला होता. आता निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेचा बुरखा गळून पडला असून नवी मुंबईतील भ्रष्ट राजकारणी व अधिकार्‍यांच्या दबावाला मुख्यमंत्री बळी पडल्याचा आरोप मनसेने प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.

मनसेकडून आयुक्तांचे कौतुक
मनपा प्रशासनाला शिस्त लावणे, विविध 23 दाखले मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, कित्येक नगरसेवकांची अनधिकृत बांधकामे पाडणे, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे निलंबन करणे, वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून सर्वसामान्य नवी मुंबईकरांशी संवाद साधणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे करणे, महसुली उत्पन्न वाढविणे, वादग्रस्त टेंडर्स रद्द करून मनपाचे 400 कोटी रुपये वाचविणे अशा एक ना अनेक कामांमुळे आयुक्त तुकाराम मुंढे सर्व सामान्य नवी मुंबईकरांच्या पसंतीस उतरले होते.जर आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली रद्द झाली नाही तर मुख्यमंत्री देखील पारदर्शकतेचा नुसता ढोल निवडणुकीपुरता बडवत असतात असा आरोप मनसेने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

रहिवाशांनी व्यक्त केला संताप
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला कार्यकाळ पूर्ण करण्याधीच मुख्यमंत्र्यांनी राजकीय बळी देऊन सर्व सामान्य नवी मुंबईकरांचा रोष ओढवून भावना दुखावल्या आहेत असे मनसेने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईत त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढा मनसेने मुख्यमंत्र्यांच्या पत्रात वाचला आहे.