मनसेकडून वारीस पठाणांवर हल्लाबोल

0

मुंबई । फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून ’बुझा हुआ दियां’ च्या टिप्पणीवरून मनसे-एमआयएम वाद पेटला आहे. ’भुंकणारे कुत्रे बरेच असतात, हत्ती डौलाने चालत राहतो. मूर्ख माणसांच्या विधानाची दखल घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही’, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांचा समाचार घेतला आहे. राज ठाकरे म्हणजे ’बुझा हुआ दियां’ असल्याची बोचरी टिप्पणी पठाण यांनी केली होती. त्यावर, कोण विझतंय हे येत्या निवडणुकीत कळेलच, असा टोलाही मनसेने हाणला आहे. मुंबईच्या स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे, तर काँग्रेस फेरीवाल्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. या वादात रविवारी वारीस पठाण यांनी उडी घेत राज ठाकरे हे विझणारा दिवा आहेत. हिंमत असेल तर भायखळ्यात येऊन तोडफोड करून दाखवा, मग तुम्हाला दाखवतो, असे खुले आव्हानच त्यांनी मनसैनिकांना दिले होते.. मनसेचं आंदोलन म्हणजे राजकीय अस्तित्व जपण्यासाठीची धडपड असल्याची खिल्ली त्यांनी उडवली होती. त्याला मनसेने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

वादग्रस्त विधाने करून लक्ष वेधून घेताहेत!
’हा मूर्ख वारीस पठाण मतविभागणीत निवडून आलाय, लॉटरी लागून आमदार झालाय. त्याचं समाजासाठी योगदान काय आहे? फक्त वादग्रस्त विधानं करून लक्ष वेधून घेण्याचं काम त्यानं केलंय. त्याच्या वक्तव्यांची दखल घ्यायचीही गरज नाही’, अशी चपराक मनसे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी लगावली. भायखळा स्टेशन परिसर 80 टक्के फेरीवालामुक्त आहे. मग तिथे आम्ही कशाला जाऊ? मुळात, फेरीवाल्यांविरोधातली कारवाई पोलीस आणि महापालिका करतेय. वारीस पठाण उगाचच मनसेचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवतोय. राज ठाकरेंच्या सभेला लाखांची गर्दी होते ती बुझा हुआ दिया आहेत म्हणून का?, दीड वर्षानंतर याला कळेल कोण विझतंय ते, असंही किल्लेदार यांनी सुनावलं. ’कुत्ते भौकते है, हाथी चलता है’, असा चिमटाही त्यांनी काढला आणि वारीस पठाण यांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना सांगितले, पठाण हे चुकून निवडून आलेली व्यक्ती आहेत. फेरीवाल्यांनी तर स्वतः अनेक ठिकाणी मनसेला पाठिंबा दर्शवत आपले ठेले बंद केले आहेत. पठाण यांचा हा मनसेचे नाव घेत प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला एक स्टंट आहे.

संदीप देशपांडेंसह 8 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्यांना 18 तारखेपर्यंत कोठडीतच तुरुंगातच राहावे लागणार आहे. मुंबईतील किला कोर्टाने हा निर्णय दिला आहे. या सगळ्यांच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या आठही जणांची आज भायखळ्याच्या आर्थर रोड जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे. काँग्रेस ऑफिसच्या तोडफोडप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरिश सोळंकी, दिवाकर पडवळ यांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची शुक्रवारी (1 डिसेंबर) सकाळी नासधूस करण्यात आली होती. या कार्यालयात घुसून मनसेने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या होत्या. मुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली होती. काँग्रेसचे कार्यालय मनसेने फोडले असे ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडेंसह आठ जणांना अटक केली होती. या सगळ्यांवर दंगल, ट्रेसपासिंग, नुकसान आणि नासधूस या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

200 महिलांना परवाना
महिलांचे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहमध्ये स्वतःचे योगदान असावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने रिक्षा परवाना काढून देण्यात आला आहे. मुंबईतील मराठी महिलांनीसुद्धा या संधीचा लाभ घ्यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर यांनी प्रयत्न करून मुलुंड मधील 200 महिलांना रिक्षा परवाना मिळवून दिला आहे. महिलांना मिळवून दिलेल्या या रिक्षा परवान्यांचे वाटप सोमवारी दादर येथील कृष्णकुंज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक महिला रिक्षा चालक उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सीमा पावसकर या महिला रिक्षा चालक म्हणाल्या, मुलुंड मध्ये 200-300 महिला रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यापैकी 100 महिला येथे आलेल्या आहेत. या राजकीय पक्षावर आमचा विश्‍वास आहे. मी सध्या घर काम करून हे प्रशिक्षण घेत आहे. हा परवाना मला भावी काळात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे त्या म्हणाल्या.