मनसेचा उपग्रहाद्वारे वृक्षगणनेला विरोध

0

महापालिका आयुक्तांना दिले मागणीचे निवेदन

पिंपरी-चिंचवड : महापालिका हद्दीतील उपग्रहाद्वारे छायाचित्रे काढून वृक्षगणना करण्याचा प्रस्ताव उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाने आयुक्तांना सादर केला आहे. या वृक्षगणनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याबाबत पर्यावरण संस्थांसह पर्यावरणप्रेमींना विश्वासात घेतलेले नाही. तसेच, यापूर्वी बीव्हीजी कंपनीला दिलेल्या दोन कोटी रुपयांची चौकशी झाल्याशिवाय हा प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणी मनसेचे राजू सावळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदनदेखील दिले आहे.

लगीनघाई कशासाठी?
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, महापालिका हद्दीतील वृक्षगणना करण्यासाठी सुमारे सहा कोटी 80 लाख रुपये एवढा खर्च होणार आहे. परंतु, करदात्या जनतेच्या पैशाची महापालिका प्रशासनाकडून उधळपट्टी सुरू आहे. यापूर्वी बीव्हीजी कंपनीला दोन कोटी रुपये दिले होते. ते पैसे नेमके गेले कुठे? त्या पैशाचा अद्याप हिशोब व माहितीही दिलेली नाही. त्यातच वृक्षगणना उपग्रहाद्वारे करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याची लगीनघाई सुरू आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

आंदोलनाचा इशारा
याबाबत विविध वृक्षप्रेमी संघटना व अभ्यासकांना माहिती न देता हा प्रस्ताव मांडलेला आहे. उपग्रहाद्वारे वृक्षगणना करण्याचे काम बीव्हीजी कंपनीला दिल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गटनेते सचिन चिखले, रुपेश पटेकर, हेमंत डांगे, राहूल जाधव, फैय्याज जाधव, सुशांत साळवी, संतोष यादव, वासीम सय्यद, निखिल गावडे यांनी दिला आहे.