मनसेचे इंजिन पुन्हा मराठी अस्मितेवर स्थिरावणार

0

मुंबई – विधानसभा निवडणुकीपासून सलग सर्व निवडणुकांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवसंजीवनी देण्यासाठी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चिंतन बैठक बोलावली. त्यात कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी मराठी अस्मितेचा मुद्दा कदापी सोडायचा नाही. तसेच त्यासोबत पक्ष बांधणीसाठी पक्षात आवश्यक ते बदल करायचे, अशी रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली.

पक्षवाढीसाठी मनसे नेत्यांनी आता जोमाने काम करावे, तसेच काही जणांना समजही दिली. पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी नेत्यांच्या चुकाही सांगितल्या, तो त्यांचा हक्क आहे, अशी प्रतिक्रिया या चिंतन बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

राज ठाकरे लवकरच मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात विभागनिहाय कार्यकर्त्यांना भेटून पुढील वाटचाल ठरवतील. गद्दारांवर कारवाई केली जाणार आहे. निवडणुकांतील पराभवाची कारणमीमांसा आधीच झाली आहे. मात्र पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचेही नांदगावकर म्हणाले. तसेच पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या तीन महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यावरही या बैठकीत चर्चा झाली असून पुढील दोन-तीन दिवसांत या निवडणुकीसंदर्भात पक्षांतर्गत चर्चा होणार असल्याचे नांदगावकर म्हणाले.