मनसेचे एक मत गेले!

0

नाना पाटेकर यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; पुण्यात एनडीए दीक्षांत समारंभाला उपस्थिती
पुणे : आपले विचार मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांचा तर मी माझा मुद्दा मांडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वैयक्तिक काही नुकसान होणार नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मत कमी झाले, अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी राज यांना प्रत्युत्तर दिले. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी मनसेने फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देणे चुकीचे असल्याचे विधान केले होते. त्यावर राज यांनी पाटेकरांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला होता. पुण्यात गुरूवारी झालेल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिलेल्या पाटेकर यांनी अन्य विषयांवरही आपली भूमिका मांडली.

मनसेला मत नाही
मुंबईत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने मत व्यक्त केले होते. भाकरीसाठी धडपडणार्‍या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला होता. नानांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावे, अशा शब्दांत राज यांनी नानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केले. नानाला वाटते तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला, असे म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली होती. यावरूनच गुरूवारी नाना पाटेकर यांनी मनसेला यापुढे माझे मत नाही, असेच थोडक्यात सुनावले आहे.