‘ब्ल्यू व्हेल’ गेमविरोधात विद्यार्थ्यांच्या जनजागृतीसाठी मनसेचे शाळेच्या मुख्याध्यापकांना निवेदन

0

नवी मुंबई | सध्या ‘ब्ल्यू व्हेल’ या नव्या मोबाईल खेळाने शालेय विद्यार्थ्यांना वेड लावलेले असून; या खेळाच्या अति वेडापायी विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पालकवर्ग चिंताग्रस्त असून या खेळाला कसा प्रतिबंध घालायचा या विवंचनेत आहेत.

नवी मुंबई मनसेने याबाबतीत आज पालिकेचे शिक्षणाधिकारी व नवी मुंबईतील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून निवेदन दिले.

तसेच पालिकेने सर्व शाळांना या खेळाविषयी जनजागृती करण्याविषयी याबाबत निवेदनात मागणी केली आहे. ‘ब्ल्यू व्हेल’या खेळाने विद्यार्थ्यांचे मेंदू पोखरला जात असून; सतत् खेळून व वेगवेगळ्या स्टेज पार केल्यावर अखेर विद्यार्थ्यांच्या मेंदू व मनावर या खेळातून ताबा मिळवला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. यासाठी पालिकेने शाळांमध्ये जनजागृती करावी. तसेच मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना बोलावून कोणत्याही विद्यार्थ्याने ‘ब्ल्यू व्हेल’ खेळाबाबत चर्चा केल्याचे आढळल्यास त्यास तातडीने रोखणे व या खेळामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगणे तसेच त्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी याबाबत बोलून सजगता बाळगण्यास सांगणे, याबाबत प्रत्येक शाळांमध्ये जनजागृती करण्याचे आव्हान मनसेने पालिका शिक्षांधिकाऱ्यांना व नवी मुंबईतील शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केले आहे.यावेळी मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, सचिव प्रेम दुबे, उपशहर अध्यक्ष विद्यार्थी सेना सनप्रीत तुरमेकर तसेच मनसैनिक उपस्थित होते.