ललित कोल्हे यांच्या रुपाने राज्यात मनसेचा एकमेव महापौर
जळगाव । महानगरपालिकेचे नगरसेवक ललित कोल्हे हे महापौर होणार हे दोन दिवस अगोदरच निश्चित झाले होते. केवळ निवडीची औपचारीकता बाकी होती. गेल्या आठवडाभरापासून महापौैर निवडीबाबत शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली होती. अखेर गुरुवारी 7 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या 11 व्या महापौरपदी ललित कोल्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौरपदाच्या निवडीसाठी एकमेव मनेसेचे ललित कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने जिल्हाधिकार्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. ललित कोल्हे यांच्या रुपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्यात एकमेव महापौरपद मिळाले आहे.
11 महिन्यासाठी संधी
सप्टेंबर 2018 मध्ये जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने ललित कोल्हे हे 11 महिन्याचा महापौर राहणार आहे. शेवटचे अडीच वर्ष शिल्लक राहिल्यानंतर नितीन लढ्ढा यांची महापौरपदी निवड करण्यात आली होती. सत्ता स्थापनेसाठी मनसेने खाविआला पाठींबा दिल्याने खाविआचे सर्वेसर्वा माजी आमदार सुरेश जैन यांनी मनसेला एकदा तरी महापौरपद देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शेवटच्या अकरा महिन्यासाठी ललित कोल्हे यांच्या रुपाने मनसेला महापौरपद देण्यात आले आहे.
मनपासमोर जल्लोष
सकाळी 11 वाजता महापौर निवडीसाठी मनपात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौरपदी ललित कोल्हे यांची बिनविरोध निवड होणार होती, त्यामुळे सभा सुरु होण्याअगोदरच मनपा इमारती समोर ढोल-ताशाचा गजर सुरु होता. महापौर निवड जाहीर झाल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊन जल्लोष करण्यात आला. निवडीनंतर पदभार स्विकारल्यानंतर ललित कोल्हे यांची शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
सर्व पक्षीय पाठींबा
जळगाव महानगरपालिकेचा शेवटचा अकरा महिन्याचा कार्यकाळ शिल्लक राहिलेला आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी राजीनामा दिल्यानंतर महापौरपदासाठी खाविआने ललित कोल्हे यांच्या नावाची घोषणा केली होती. ललित कोल्हे यांना खाविआसह राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, जनक्रांतीने पाठींबा जाहीर केल्याने संख्याबळानुसार ते महापौर होणार हे निश्चित होते. दरम्यान भाजपाने नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा केल्याने निवडणुकीची शक्यता होती. परंतू स्वतः ललित कोल्हे यांनी भाजपा महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजू मामा)यांची भेट घेऊन पाठींबा देण्यासाठी प्रस्ताव दिला होता. भाजपाने देखील विकासाच्या मुद्दावर ललित कोल्हे यांना पाठींबा देण्याची घोषणा केल्याने ललित कोल्हे यांना महापौरपदासाठी सर्व पक्षीय पाठींबा मिळाला.
कोल्हेंसमोर आव्हानाचे डोंगर
जळगाव महानगरपालिकेवर कर्जाचे मोठे डोंगर आहे. अनेक महापौरांनी मनपाला कर्जातून मुक्त करण्याचे आश्वासन दिले मात्र ते शक्य झाले नाही. अद्यापही मनपावरील कर्जाचे डोंगर कायम असल्याने नवनियुक्त महापौर ललित कोल्हे यांच्या समोर मनपाला कर्जमुक्त करण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कर्ज मुक्तीसोबतच गाळेधारकांचे प्रश्न, आरोग्य, सफाई इत्यादी प्रश्नांना उर्वरीत काळासाठी महापौरांना सामोरे जावे लागणार आहे.
नवविकासाला प्राधान्य देणार
शहराच्या विकासासाठी नवविकास (न्यू डेव्हेलपमेंट)ला प्रथम प्राधान्य देऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त महापौर ललित कोल्हे यांनी पदभार स्विकारतांना जाहीर केले. सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पंधरा दिवसात लोकदरबारीचे आयोजन करण्यात येईल. पदाधिकार्यांना भेटणे सामान्य नागरिकांना अवघड जात असल्याने दररोज सर्व पदाधिकारी सकाळी 11 ते 1 या वेळेत दुसर्या मजल्यावरील सभागृहात थांबून नागरिकांचे प्रश्न समजून घेतील असे महापौर कोल्हे यांनी जाहीर केले. 25 कोटी निधी वाटपात सर्व पक्षीय नगरसेवक आणि आमदारांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यमान मनपाचे शेवटचे एक वर्ष राहिले आहे. त्यामुळे राजकारणापेक्षा विकासावर भर देणे महत्वाचे आहे. महापौर निवडीत राजकारण होवू नये यासाठी मी स्वतः आमदार भोळे यांच्याकडे बिनविरोधसाठी प्रस्ताव घेऊन गेलो. माजी आमदार सुरेश जैन यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, शहरातील नागरिकांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न करेल.
– ललित कोल्हे, नवनियुक्त महापौर