मुंबई: मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीला मनसेने घेरले आहे. मात्र मनसेच्या आक्रमकपणामुळे अॅमेझॉनने नमते धोरण घेतले आहे. मनसेच्या दणक्यानंतर अॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच अॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त केली आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी ही माहिती दिली.
मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.