मुंबई । मनसेतून पक्षांतर करत शिवसेनेसोबत गेलेल्या त्या सहा नगरसेवकांची मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र कोकण विभागीय आयुक्त आजारी असल्याने ते रजेवर होते त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या सोमवारी त्या नगरसेवकांना पुन्हा तारीख व वेळ दिली जाईल, त्यानंतर त्यावर अभिप्राय नोंदविण्यात येणार असल्याचे समजते. भाजपने शिवसेनेला दिलेल्या आव्हानामुळे मनसेचे पालिकेतील गटनेते दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, आणि अर्चना भालेराव यांनी मनसेतून फुटून शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेची ही खेळी भाजपसह मनसेच्या जिव्हारी लागली. मनसेने कायदेशीर मार्ग पत्करून फुटीर नगरसेवकांची कोंडी करण्यावर भर दिला. पक्षांतर केलेल्या घटनेला एक महिना उलटून गेला. तरी या नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही.