मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता दुकानांच्या नावाच्या पाट्या गुजराती भाषेत लिहिणार्याव दुकानदारांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रभादेवी येथील दोन दुकानांसमोर निदर्शने केली. त्या दुकानांच्या नावांच्या पाट्या ह्या गुजराती भाषेत लिहिलेल्या होत्या. अचानक मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे हे दुकानदार भेदरून गेले, त्यातील एका दुकानदाराने त्वरित त्याच्या दुकानाचा बोर्ड खाली उतरवला, तर दुसर्यार दुकानाचा फलक मनसेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने खाली उतरवला. याप्रकारच्या आंदोलनामुळे मनसे पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट होते. आजच्या आंदोलनात दुकानांच्या पाट्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या 7 कार्यकर्त्यांना अटक केली.
मराठी भाषेला पर्याय नकोच
याप्रकरणी बोलताना मनसेचे नेते संतोष धुरी म्हणाले, दुकानांच्या नावांच्या पाट्या मराठी भाषेतच असाव्यात या भूमिकेमुळे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आम्ही कुणालाही मराठी भाषेला पर्यायी भाषा ठरवण्यास परवानगी देणार नाही. असे करणार्यांमना आम्ही नक्की जाब विचारू. सध्या गुजराती भाषेत दुकानांच्या नावांच्या पाट्या बनवण्याची पद्धत व्यापार्यांमनी रूढ केली आहे, ज्याला मनसे कदापी वाढू देणार नाही.
दुकानदारांना दिला दम
दरम्यान निदर्शनाच्या वेळी संबंधित दुकानदाराने हा फलक जाणीवपूर्वक लावला नसून गुजराती भाषेतील ग्राहकांना दुकान आपले वाटावे म्हणून हा व्यावसायिकदृष्टीकोनातील प्रयत्न केला आहे, असे तो दुकानदार म्हणाला. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दुकानदाराला नावाचा फलक खाली उतरवण्यास भाग पाडले. मुंबईत दक्षिण भारतीयही राहतात, म्हणून उद्या त्या भाषिक व्यापार्यांयनी त्यांच्या दुकानांच्या नावाच्या पाट्या तामिळ किंवा कन्नड भाषेेत लावाव्यात का?, असा प्रतिप्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला.
2008ची मोहीम पुन्हा सुरू
वर्ष 2008 साली मनसेने दुकानांच्या नावांच्या पाट्या मराठीत असाव्यात, अशी मागणी करत मोहिम उघडली होती. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी निदर्शने करून इंग्रजी भाषेतील दुकानांच्या पाट्या बदलण्यास भाग पाडले होते. त्यामुळे मॅकडॉनाल्ड सारख्या मोठ्या फ्रेंचाईसनेही त्यांच्या दुकानाच्या पाटीवर इंग्रजीबरोबर मराठी नावही लिहिले. मात्र, या मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ती थांबवण्यात आली होती.