मुंबई-कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षात केवळ गाजर दिल्याचा आरोप करत मनसेने चक्क गाजराचा केक कापत निषेध केला आहे. २०१५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर विकासासाठी ६५०० कोटींचे ‘निवडणूक पॅकेज’च जाहीर केले होते. पण केडीएमसीचा काहीही विकास झाला नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेने यावेळी भाजपा सरकराच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला .
मनसेने गाजराच्या आकाराचा केक कापतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. २०१५ मध्ये केडीएमसीच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अश्वासनाची पुर्तता झाली नाही. आजतागायत केडीएमसीला एकही रुपया मिळालेला नसून मुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक करत गाजर दाखवल्याचा मनसेचा आरोप आहे. याचाच निषेध करण्यासाठी मनसेनं आज डोंबिवलीत गाजराचा केक कापला. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली व तीन वर्षांनंतरही पैसे न आल्याचा मनसेकडून निषेध केला गेला.