पुणे । चार महिन्यांपासून शहरात कोणत्याही प्रकारची विकास कामे केली जात नसून त्यात महापालिकेच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. हा खर्च सभागृहासमोर ठेवण्यात यावा, या मागणीसाठी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी सभागृहात ढोल वाजवून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
भाजपच्या नगरसेवकांनी रोखले
पुणे महानगरपालिकेची सर्व साधारण सभा सुरू होताच मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी ढोल सभागृहात आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सभागृहाबाहेरील सुरक्षारक्षकांनी त्यांना आतमध्ये प्रवेश नाकारला. तरी देखील ते आतमध्ये येण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा सभागृहातील भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांना आतमध्ये येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मनसेच्या साथीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांचा विरोध हाणून पाडत. सभागृहात प्रवेश केला.
खर्चाचा अहवाल द्या
सभागृहात प्रवेश करताच मनसे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी ढोल वाजवून प्रशासन आणि सत्ताधार्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला. रौप्य महोत्सवी गणेशोत्सावर करण्यात येणारा यावर खर्च सभागृहात मांडवा, प्रशासनाने याबाबतची भूमिका जाहीर करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.
सामान्यांच्या पैशावर भाजपचा डल्ला
मागील चार महिन्यांपासून शहरात कोणत्याही प्रकारची कामे केली जात नसून प्रशासन आणि सत्ताधारी मिळवून केवळ जाहिरातबाजीत गुंतल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र, त्यात ही ते अपयशी ठरत असून सर्व सामान्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम त्यांनी केले आहे, अशी टीका मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली. शहरातील विकास कामे मार्गी लागली पाहिजेत आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवाबाबत खुलासा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.