मनसेशी घरोबा; शिवसेनेशी वितुष्ट

0

पुणे । शिवसेनेला विरोध आणि मनसेशी जवळीक अशा पद्धतीचे राजकारण भाजप करणार, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. किंबहुना पुण्यातील एकाच दिवशी घडलेल्या दोन घटना त्या दृष्टीने बोलक्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले दोन-तीन दिवस पुण्यातच मुक्कामाला होते. याकाळात त्यांनी कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संवाद साधला. याच दरम्यान त्यांची भाजप नेत्यांशीही जवळीक साधली गेली. जुन्या ओंकारेश्‍वर मंदिराचे प्रमुखपद पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे आहे. सोमवती अमावस्येला तिथे महाआरती आयोजित करण्यात आली होती. त्या आरतीला राज ठाकरे उपस्थित राहिले. स्वत: बापट, नगरसेवक महेश लडकत आदी भाजप आणि रा. स्व.संघाचे पदाधिकारी होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी ठाकरे यांनी मुठा नदीचा एक विकास आराखडा सादर केला. याही सादरीकरणाला बापट, महापौर मुक्ता टिळक, महापालिकेतील गटनेते श्रीनाथ भिमाले हजर राहिले. त्याच दिवशी महापालिका सभेत भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात घोषणाबाजी झाली. गणेशोत्सवात महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी भाजप करीत असल्याचा आरोप सेनेने केला.

मित्र की विरोधक?
शिवसेना आणि भाजप मित्र की विरोधक? हा संभ्रमात टाकणारा प्रश्‍न आहे, पण पुण्यात तरी दोघे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यातही शिवसेनेतील एका गटाचा बापट यांना सातत्याने विरोध राहिला आहे. पण त्याचवेळी भाजप आणि राज ठाकरे यांचे एकत्रित कार्यक्रमाने राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाली आहे. केंद्र सरकारने मुठा नदी सुधारणेसाठी 800 कोटी मंजूर केले आहेत. निधी मंजुरीनंतर खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सत्कार केला होता. आपल्याच सरकारची एक योजना अजून मार्गी लागलेली नाही आणि अशातच राज ठाकरे यांच्या योजनेचे कौतुक भाजपमधूनच सुरू झाले याचा अर्थ काय? असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे, पक्षात तशी चर्चाही चालू झाली.

सेनेला शह देण्यासाठी मनसेशी सलगी
महापालिकेत भाजपचे बहुमत आहे, तिथे मनसेच्या 2 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज नाही. उलट सत्ताधारी पक्षाशी जवळीक साधली गेल्याने मनसेचा फायदा होणार आहे. तरीही सेनेला शह देण्यासाठी मनसेशी सलगी साधली जात आहे. नारायण राणे यांचे स्वागत भाजप नेत्यांकडून होतंय, त्यातून सेना डिवचली गेली आहे. त्यातच पुण्यातील राज ठाकरे यांच्याशी पालकमंत्री बापट यांनी केलेल्या गळाभेटीने भर पडली आहे.