आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू
पुणे : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. मात्र, आम्हांला एमआयएम किंवा मनसे यांपैकी कोणीही नको आहे. आमच्या मित्र पक्षाकडूनही त्यांच्यासाठी नकारच आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत ते म्हणाले, ते आले तर आनंदच होईल मात्र त्यांना एमआयएमची साथ सोडावी लागेल. पुण्यात काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेपूर्वीच्या काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खा. चव्हाण बोलत होते.
तरीही त्याला आमचा प्रखर विरोध
राष्ट्रवादी काँग्रेसने जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली, तरीही त्याला आमचा प्रखर विरोध राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनसे आणि एमआयएमला आघाडीमध्ये ‘नो एन्ट्री’ आहे, हे दोन्ही पक्ष आम्हाला चालणार नाहीत, असे स्पष्टीकरण खा. चव्हाण यांनी दिले आहे. दुसरीकडे, बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, अशी आमची इच्छा आहे. यासंबंधीचा प्रस्ताव अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिला असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पहात असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
पुण्याच्या जागेसाठी आग्रही
पुण्याची जागा लढवण्यावर ते म्हणाले की, पुण्याची जागा आमचीच आहे, ती आम्ही लढवू, निवडून येण्याची क्षमता हीच गुणवत्ता आहे. निवडणूक आयोगाने दिलेला खर्च करण्याची क्षमता हाही निकष आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी आम्हीही आग्रही आहोत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
यावेळी माजी खासदार एकनाथराव गायकवाड, आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा यांच्या निवडणुका एकत्रित होतील असा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला. जनसंघर्ष यात्रा सुरू करण्यापूर्वी चव्हाण यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.