मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे प्रयत्न

0

पुणे । फेरीवाला आंदोलनात अटक केलेल्या 13 कार्यकर्त्यांवर लावलेले दरोड्याचे गुन्हे मागे घ्यावेत, याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. सरकार हे गुन्हे मागे घेईल, अशी मनसेला आशा वाटते.परप्रांतीय फेरीवाले यांच्याविरुध्द मनसेने पुण्यात आंदोलन केले होते. त्यात फेरीवाल्यांकडील सामानाची नासधूस करण्यात आली. या आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांवर दरोड्यासह काही कलमे पोलिस खात्याने लावली. अटक झालेल्यांना चार दिवस पोलिस कोठडी आणि त्यानंतर 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांना साकडे
पोलीस खात्याने दरोड्याचा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिस आयुक्तांकडे केली. याखेरीज नेत्यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचीही भेट घेऊन कलम 395 मागे घ्यावे, असे सुचविले. बापट यांनी प्रकरण तपासण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे दरोड्याचे कलम मागे घेतले जाईल, असे मानले जाते.

पोलिस अधिकार्‍यांच्या भेटी
दरम्यान पुण्यातील नेत्यांनीही पोलिस अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन आपल्या मागणीचा पाठपुरावा चालू ठेवला आहे. याखेरीज मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन नातलगांना दिलासा दिला, अशी माहिती मनसे नेते बाळा शेडगे यांनी दिली. पोलिस खात्यामार्फत गंभीर गुन्हाची कलमे लावून एखादे आंदोलन संपविणे योग्य नाही, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे. यामुळे या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.