मनसे पोटनिवडणूक लढणार नाही!

0

पुणे । पुणे महापालिकेचे दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 21 (अ) ची पोटनिवडणूक 11 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी भाजप-रिपब्लिकन आघाडीच्या वतीने हिमाली कांबळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कांबळे यांना श्रद्धांजली म्हणून या जागेवर मनसे उमेदवारी देणार नसल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. याबाबतचे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.

पुणे महापालिकेसह बृहन्मुंबई, नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी होईल. प्रभाग क्रमांक 21 (अ) मध्ये ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून भाजप आणि रिपाईचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मनसेने या प्रभागात उमेदवार देऊ नये यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानंतर ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.