नांदेड : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंग्रेससह मनसेवर जोरदार हल्ला बोल केला. काय अवस्था आहे, त्या राज आणि त्यांच्या मनेसेची. मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. त्यानंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली. आता तर उनसे झाली आहे, म्हणजे उमेदवार नसलेली सेना. लग्न दुसऱ्याच आणि हे नाचून राहिले आहेत. म्हणजे, रताळ्याला म्हणतात केळ आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचत आहे खुळ, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर तोंडसुख घेतले.
देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल नांदेडमध्ये केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या टीकेला उत्तर दिले.
महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला असे सांगितले. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तु्म्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही 2 हजार 226 कोटी थेट शेतकऱ्यांना दिले हे तुम्ही कसं विसरता? असाही सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.