फैजपूर। येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ‘योगासने व प्राणायाम’ शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली योगप्रशिक्षक रघुनाथ टोके यांनी उपस्थितांना जीवनासाठी योग विषद करुन विविध योगासने आणि प्राणायाम करवून घेतले.
दैनंदिन जीवनात योगाला स्थान
आंतरराष्ट्रीय स्तरावर योग विद्येचे नेतृत्व भारताने स्विकारुन योग आणि प्राणायाम यांचे धकाधकीच्या आधुनिक जीवनातील अनन्य स्थान पुन्हा एकदा प्रस्थापित केले आहे. भौतिक सुखांचा पाठलाग करतांना माणूस आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि जीवनाचा उत्तरार्ध चिंतातूर अवस्थेत व्यतित करतो. याऐवजी दैनंदिन कार्य पध्दतीने योगाला स्थान देवून आपण मन व बुध्दी संतुलित राखून आनंदी जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी याप्रसंगी बोलतांना केले.
योगिक शास्त्र अभ्यासक्रम
योग शिबिराचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी योग विद्येचे जास्तीत जास्त अवलंब करण्याचे आवाहन केले आणि त्यासाठी महाविद्यालयात यौगिक शास्त्र हा नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे नमूद केले. महाविद्यालयात विविध सण, उत्सव व दिनविशेष साजरा करण्याच्या समितीचे प्रमुख प्रा.डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी योग शास्त्राचे ऐतिहासिक संदर्भ देत जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग विद्येचे धडे पोहचले पाहिजेत, असा आशावाद व्यक्त केला.
शास्त्रशुध्द मार्गदर्शन
योग प्रशिक्षक रघुनाथ टोके यांनी योग विद्येचे सविस्तर विश्लेषण करुन आयुष मंत्रालयाने पारीत केलेल्या योगा अभ्यासक्रमानुसार विविध प्रकारची योगासने, प्राणायाम व विविध मुद्रा इ. शास्त्रशुध्दरितीने उपस्थितांकडून करवून घेतले. योग शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, खेळाडू, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेटस् यांनी योग प्रशिक्षक टोके यांच्या मार्गदर्शनानुसार विविध योगासने व प्राणायामांचे प्रात्याक्षिक केले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, दिलीप धांडे, प्रा. रेखा चौधरी, प्रा. ए.जी. सरोदे, प्रा. डी.बी. तायडे, डॉ. ए.आय. भंगाळे, डॉ. उदय जगताप, प्रा.डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. जी.जी. कोल्हे, डॉ. शरद बिर्हाडे, डॉ. जी.एस. मारताळे, प्रा. राजेंद्र राजपूत आदींनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रा. राजेंद्र राजपूत यांनी तर आभार प्रा.डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी मानले.
वरणगाव महाविद्यालयात योगासन, प्राणायमाचे शास्त्रीय मार्गदर्शन
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहा. समाजाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय वरणगाव येथे तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस सकाळी 8 वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात शारिरीक शिक्षण संचालक प्राध्यापक सुभाष वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अंनतराज पाटील, उपप्राचार्य के.बी. पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना प्रार्थना, शिथीलीकरण व्यायाम, योग स्थितीचा सराव, उभे राहून, बसून, पोटावर झोपून आसन, प्राणायाम व ध्यान संकल्पना राजेंद्र भोई, अंकुश मराठे या विद्यार्थ्यांनी प्रात्याक्षिक करुन दाखविले. व सर्वांच्या सहकार्यातून तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.आनिल शिंदे, प्रा.एन.एस. धांडे यांसह प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.