मनीषा नगर खाडीत पोहण्यास गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

0

ठाणे : ठाण्याजवळील कळवा येथील खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही मुले कळवा येथील मनिषा नगरमधील असल्याची माहिती मिळाली आहे. कळव्याच्या मनीषा नगर खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या 4 मुलांपैकी दोन मुलांचा खाडीत बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन पथके पोहचल्यानंतरच दोन मुलांचे मृतदेह काढण्यात आले.

कळवा महात्माफुले नगर परिसरात असलेल्या झोपडपट्टी मधील चार अल्पवयीन मुले बुधवारी दुपारी 12-30 वाजण्याच्या सुमारास मनीषा नगर येथील खाडीत पोहण्यासाठी गेली होती. यात जितू (9 वर्ष), दिपू (13) वर्ष, कुलदीप विनोद राहोदिया(9) आणि बजींदर सुरेंद्र सहानी(8) यांचा समावेश होता. उकाड्यामुळे हि चारही मुले खाडीत पोहण्यासाठी गेली होती. त्यापैकी जितू हा पाण्यात उताराला नव्हता तर तो किनार्‍यावर बसला होता. तर दिपू, कुलदीप, बजींदर हे पाण्यात पोहत असतानाच कुलदीप राहोदिया आणि बजींदर सहानी आणि दिपू बुडू लागल्याने आरडाओरड झाल्यानंतर काही क्षणातच अग्नीशमन दल घटनास्थळी पोहचले. दरम्यान अग्निशमन दलाने मात्र दिपूला वाचविण्यात यश मिळवले. तर कुलदीप राहोदिया आणि बजींदर सहानी मात्र बुडाले. अग्नीशमन दलाने दोन्ही मुलांचे मृतावस्थेत मृतदेह बाहेर काढले. त्यांचे शव विच्छेदनासाठी कळवा रुग्णालयात पाठविण्यात आले. पोहण्यास गेलेली मुले बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे फायरमन रवी पवार(48) यांच्या पायाला खाडीतील काच लागल्याने त्यांचा पाय चिरला. त्यांना उपचारार्थ कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पायाला 4 टाके पडल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.