मनीष आनंद यांच्या दावेदारीने शिवाजीनगर मतदारसंघच्या राजकारणाला कलाटणी!

0

पुणे : खडकी छावणी बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद आमदारकीच्या रिंगणात उतरल्याने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. अलीकडेच आनंद यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला, त्यावेळी खडकी आणि परिसरात शुभेच्छांचे फलक लावण्यात आले. त्यावर भावी आमदार असा उल्लेख आवर्जुन करण्यात आला होता. अजून दोन वर्षांनी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीची ही बाब तयारीच मानली गेली आहे.

आनंद यांच्या मार्गातील अडथळे दूर
सुदैवाने मनीष आनंद यांना उमेदवारीसाठी आतातरी अनुकूल वातावरण आहे. माजी आमदार विनायक निम्हण यांनी काँग्रेससोडून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस पक्षातील नेत्यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झालेला आहे. दत्ता बहिरट, दत्ता गायकवाड या नेत्यांची राजकीय पातळीवर तूर्त तरी पिछेहाट झालेली दिसते. ही राजकीय परिस्थिती पाहता मनीष आनंद यांना चांगलात राजकीय स्पेस उपलब्ध झालेला आहे. ते मध्यमवयीन आहेत, शिवाय खडकीच्या राजकारणावर त्यांची पकड आहे. काँग्रेसला उमेदवारीसाठी ते चांगला पर्याय ठरू शकतात. आगामी दोन वर्षांचा अवधीही त्यांच्या हाती आहे.

शिवाजीनगर मतदारसंघाचे राजकारण बदलणार
गेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विनायक निम्हण आणि अनिल भोसले हे बलाढ्य उमेदवार होते. त्यांच्यातच मतांची विभागणी झाल्याने भाजपचे उमेदवार विजय काळे सहज विजयी झाले. आगामी निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे उमेदवार नवीनच असतील. त्यातही हा मतदारसंघ काँग्रेसला सोयीचा असल्याने आनंद यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरेल. त्यामुळेच त्यांच्या आमदारकी लढविण्याच्या संकेताने शिवाजीनगर मतदारसंघाचे राजकारण बदलणार आहे.