मनीष जैन परतले…तीन वर्षानंतर राजकारणात झाले सक्रीय

0

जळगाव। 2014च्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर तब्बल तीन वर्षानंतर मनीष जैन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला लावलेली उपस्थिती जाणकारांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. बैठकीत ईश्‍वरबाबूजी जैन यांनी केलेली फटकेबाजी आणि यासोबत मनीषदादांची उपस्थिती ही जैन पिता-पुत्र आगामी कालखंडात राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत देणारी ठरली आहे.

दुहेरी धक्का
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनीष जैन यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविली होती. यात त्यांना दारूण पराभवला सामोरे जावे लागले. दरम्यान ते विधानपरिषदेत अपक्ष आमदार असल्यामुळे भविष्यात अडचण येऊ नये म्हणून त्यांनी आधीच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याने त्यांना एकाच वेळी दुहेरी धक्का बसला होता. अर्थात ते लागलीच राजकारणातून बाजूला होतील असे कुणाला वाटले नव्हते. पण तब्बल तीन वर्षापर्यंत त्यांनी राजकीय व्यासपीठावर जाणे टाळले होते.

पक्षकार्यापासून अलीप्त
नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मनीष जैन कुठेच दिसले नाही. त्यांच्या काही समर्थकांनी या निवडणुकांमध्ये भाग घेतला तरी खुद्द ते स्वत: कुठेही दिसून आले नाही. दरम्यानच्या कालखंडातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा, मेळावे, आंदोलने, बैठका आदींमध्येही ते सहभागी झाले नव्हते. मध्यंतरी ते व्यवसायानिमित्त बहुतांश वेळ परदेशात वास्तव्यास होते. या पार्श्‍वभूमिवर शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला हजेरी लावल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

लक्ष्य कोणते ?
2010च्या अखेरीस प्रचंड गाजलेल्या विधानपरिषदेत विजय मिळवल्यानंतर मनीष जैन हे जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रस्थानी आले होते. विशेष करून एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन या दोन मातब्बरांमधील राजकीय वर्चस्वाच्या लढाईतले महत्वाचे मोहरे असणारे मनीष जैन लोकसभेतील पराभवानंतर अचानक गायब झाल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. आता येत्या कालखंडात जळगाव महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्‍वभूमिवर राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्षपदावर त्यांचे लक्ष असू शकते. यासोबत ते पुन्हा लोकसभेची तयारीदेखील करू शकतात. अर्थात आज त्यांनी पत्ते खुले केले नसले तरी आता ते राजकारणात सक्रीय होणार असल्याची बाब निश्‍चित मानली जात आहे.