नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. जर मनुस्मृतीला विरोध केला तर दाभोलकर, पानसरे करु अशा आशयाची धमकी एका पत्राद्वारे भुजबळांना देण्यात आली आहे. मनुस्मृतीला विरोध केला तर तुम्हालाही जीवे मारले जाईल असे या पत्रात म्हटले आहे.
नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नाशिकमधील पदाधिकारी, कार्यकर्ते पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात तक्रार नोंदवणार आहे.
आम्हाला मनुस्मृती नको आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हवे आहे असे भुजबळ काही दिवसांपूर्वी नागपुरात बोलले होते. तसेच, भुजबळांनी वेळोवेळी मनुस्मृतीचा निषेध नोंदवला आहे. धमकीचं पत्र मिळाल्याचं समजताच भुजबळ फार्मवर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. या धमकी पत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.