मनोज कुमार, कविंदर बिष्ठने दुसर्‍या फेरीत

0

19 व्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची आशा कायम

हॅम्बर्ग । भारताच्या मनोज कुमार आणि कविंदर बिष्ठने 19 व्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील सुरूवातीची लढत सहज जिंकत भारताला चांगली सुरूवात करून दिली. मनोजने 69 किलो वेल्टरवेट गटात मॉलदोव्हाच्या वासिली बेलॉसचा 3-2 असा पराभव केला. कविंदरने 52 किलो फ्लायवेट लढतीत जपानच्या रूसेई बाबावर 3-2 असा विजय मिळवला. अन्य लढतींमध्ये भारताच्या पदारात निराशा पडली. आशियाई क्रीडा स्पर्धांमधील कांस्यपदक विजेत्या सतीशकुमारला (91 किलोहून अधिक वजनी गट) अझैरबजानच्या दोन वेळा विश्‍वविजेतेपद मिळवणार्‍या मोहम्मदरसूल माजीदोव्हकडून 0-5 असा पराभव पत्कारायला लागला. हॅम्बर्गमध्ये दाखल झाल्यावर सतीशला तापाची लागण झाली होती. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणार्‍या कविंदरने सावध सुरूवात केली होती.

पहिल्या तीन मिनीटांमध्ये कविंदरने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या ताकद आणि खेळाचा अंदाज घेतला. त्यामुळे रूसेईने गुण मिळवत आघाडी मिळवली होती. कविंदरने लगेचच ही पिछाडी भरून काढण्यासाठी आक्रमक खेळ केला. कविंदरच्या डावखुर्‍या फटक्यांनी रूसेईच्या खेळाची लय बिघडवून टाकली.

पुढील लढतीत कविंदरचा सामना तिसर्‍या मानांकित अल्जेरियाच्या मोहम्मद फ्लिसीशी होईल. फ्लिसीने याआधी दोन वेळा जागतिक स्पर्धेतील पदक जिंकले होते. फ्लिसीने 2015 मध्ये कांस्यपदक आणि 2013 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. मनोजकुमारने मात्र कविंदरच्या उलट खेळ केला. 31 वर्षीय मनोजने पहिल्या दोन फेर्‍यांमध्येच आपला दबदबा कायम केला होता.