मनोज चव्हाण, सोनाली हेळवी करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

0

मुंबई । कटक-ओडिसा येथे 12 ते 15 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या 44व्या कुमार, कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या मनोज चव्हाणकडे कुमारतर सातार्‍याच्या सोनाली हेळवीकडे कुमारी गटाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. कुमारी संघात पुण्याचा वरचष्मा आहे. त्यांचे चार खेळाडू या संघात आहेत, तर एक खेळाडू राखीवमध्ये आहे. त्या खालोखाल सातार्‍याचे दोन खेळाडू या संघात आहेत. त्याचबरोबर उपनगर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, ठाणे, रायगड या जिल्ह्याचे प्रत्येकी एकएक खेळाडू या संघात आहेत.

मुंबई शहर संघाची एकही खेळाडू या संघात नाही. राखीव मध्ये मात्र एक खेळाडू आहे. कुमार संघात कोल्हापूरचे तीन, सांगली व जळगावचे दोन, तर मुंबई शहर, रत्नागिरी, उपनगर, ठाणे, सातारा, यांचे प्रत्येकी एक खेळाडू या संघात आहेत. गतवर्षी वडोदरा-गुजरात येथे झालेल्या 43व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाले होते. महाराष्ट्राचे हे दोन्ही संघ 9डिसेंबर रोजी कोणार्क एक्स्प्रेसने स्पर्धेकरिता रवाना होतील. महाराष्ट्राचे हे दोन्ही संघ राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी या पत्रकाद्वारे प्रासार माध्यमांसाठी जाहीर केली.